‘अगस्ति’ कर्जमुक्त करण्यासाठी सर्वांनी साथ द्या ः पिचड कारखान्याची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न

नायक वृत्तसेवा, अकोले
शेतकरी, सभासदांच्या विश्वासावर अगस्ति कारखाना अडचणींवर मात करून वाटचाल करीत आहे. संचालक मंडळ स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन कारखाना चालवत आहे. कारखाना स्वयंपूर्ण, कर्जमुक्त होण्यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सभासद, कामगारांनी साथ द्यावी. तसे झाल्यास चार वर्षांत कारखाना कर्जमुक्त होईल, असे प्रतिपादन अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.

बुधवारी (ता.29) अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या 27 व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. उपाध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड, प्रकाश मालुंजकर, गिरजाजी जाधव, मच्छिंद्र धुमाळ, अशोक देशमुख, सुधाकर देशमुख, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष गायकर यांनी कारखान्याने सहा लाख टन ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. कारखान्यावर 218.19 कोटींचे कर्ज असून, ते कमी करण्यासाठी उपपदार्थांची निर्मिती केली जाईल.

योग्य पद्धतीने गाळपाचे नियोजन केले आहे. सुधारित ऊस बियाण्याचे वाटप केले आहे. आदिवासी क्षेत्रात ऊस वाढीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एफआरपीची रक्कम 103 कोटी 21 लाख रुपये उपलब्ध असताना, त्यापेक्षा अधिक रक्कम देण्यात आली असल्याचे गायकर म्हणाले. यावेळी बी. जे. देशमुख, सुनील वाळुंज, सुरेश नवले, भाजपचे जालिंदर वाकचौरे यांनी चर्चेत भाग घेतला. मागील सभेचे अहवाल वाचन सहायक कार्यकारी संचालक एकनाथ शेळके यांनी केले. सभासदांच्या प्रश्नांना कार्यकारी संचालक देशमुख यांनी उत्तर दिली.
a
अधिकारी, संचालकांची दिलगिरी..
भाजपचे जालिंदर वाकचौरे यांनी अहवालात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे छायाचित्र छापले त्याबद्दल दुमत नाही. मात्र, केंद्र व राज्य सरकार कारखान्यांना मदत करत असताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे छायाचित्र नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर कार्यकारी संचालक व संचालकांनी दिलगिरी व्यक्त केली.
