गरम पाणी अंगावर सांडल्याने आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू

नायक वृत्तसेवा, आश्वी 
संगमनेर तालुक्यातील खळी (कांगणवाडी) येथे अंघोळीसाठी गरम केलेले पाणी अंगावर सांडल्याने आजी- नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सिंधुबाई नामदेव सोसे (वय ६०) आणि राहुल प्रकाश सोसे (वय ५) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आजी आणि नातवाचे नाव आहे.दोघेही या घटनेत गंभीररित्या भाजले होते.
सोमवार दि.८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अंघोळीसाठी गरम केलेले पाणी त्यांच्या अंगावर सांडले. या घटनेत दोघेही जवळपास ६० टक्के भाजले होते.विशेषतः पाठीचा मागील भाग आणि पाय जास्त प्रमाणात भाजल्याने  त्यांना तात्काळ लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सात दिवसांनी १५ सप्टेंबर रोजी आजी सिंधुबाई सोसे यांचा मृत्यू झाला, तर घटनेच्या १५ दिवसांनी मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी चिमुकल्या पाच वर्षाच्या  राहुल प्रकाश सोसे याचाही जगण्याचा संघर्ष कायमचा थांबला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोसे कुटुंबावर आणि खळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने खळी आणि पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
सोसे कुटुंबीय अत्यंत साधे, कष्टकरी आणि मनमिळाऊ म्हणून ओळखले जाते. या कठीण काळात कांगणवाडीतील सर्व ग्रामस्थांनी सोसे कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आणि कुटुंबाला धीर दिला.
Visits: 106 Today: 1 Total: 1961098

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *