कोविड संक्रमणाचा बाजार हलण्याचे नावंच घेईना! अध्यापक विद्यालयापासून उठवलेला बाजार ईदगाह मैदानाजवळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने राज्यातील गर्दीची सर्व ठिकाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व आठवडे बाजार व भाजी बाजार पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले असून भाजी विक्रेत्यांना दारोदारी जावून भाजी विकण्याची मूभा देण्यात आली आहे. मात्र संगमनेरातील भाजी विके्रते व्यवसायापुढे कोविडला शून्य समजत असून इररोज संक्रमणाचा बाजार लावून ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत. प्रशासनाने आज सकाळी सक्तिने अकोले रस्त्यावरील अध्यापक विद्यालयाजवळील (बी.एड.कॉलेज) बाजार उठविला, मात्र काही वेळातच तो बाजार ईदगाह मैदानाजवळ भरल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

सध्या जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर संक्रमणाचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून नागरी हित लक्षात घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोठेही एका जागी बसून भाजी विक्री करण्याला बंधने घालण्यात आली आहे. मात्र असे असतांनाही संगमनेरात दररोज भाजी बाजार भरत असून नागरिकही कोविड संक्रमणाची भिती दूर सारुन दररोज ताजी भाजी घेण्यासाठी आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून तेथे गर्दी करीत असल्याचे विदारक दृष्य गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील अकोले रस्त्यावर असलेल्या अध्यापक विद्यालयाच्या परिसरात दिसत होते.

पालिका प्रशासन आणि पोलिसांनी आज सकाळी संयुक्त कारवाई करतांना जत्रेप्रमाणे भरलेला अकोले रस्त्यावरील बाजार बळाचा वापर करुन उठवून दिला व त्यांना पुन्हा येथे न बसण्याची तंबीही दिली. मात्र गेल्या वेळच्या ‘राजकीय आशीर्वादा’मुळे बेडकाप्रमाणे फुगलेल्या येथील काही भाजी विक्रेत्यांनी अधिकार्यांचे आवाहन आणि सध्याची परिस्थिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत तेथून पुढे जात ईदगाह मैदानाच्या परिसरात नवीन तांबे हॉस्पिटल रस्त्यावर पथार्या मांडल्या आणि संवेदनशून्य नागरिकांनी तेथेही भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे विचित्र दृष्य आज सकाळी पहायला मिळाले. कोविड संक्रमणाला कारणीभूत ठरत असूनही सामान्य नागरिकांना कोविडबाबत गांभिर्य समजत नसल्याने प्रशासनातील अधिकारीही नागरिकांच्या या हुल्लडबाज स्वभावामुळे हतबल झाल्याचे चित्र आहे.

अकोले रस्त्यावरील पेटीट अध्यापक विद्यालयाजवळ बसणारा बाजार गेल्यावर्षी दिवाळीपूर्वीच पालिका प्रशासनाने हटविला होता. मात्र त्यानंतर त्यातील काही ‘अतिशहाण्या’ भाजी व्यापार्यांनी थेट एका बड्या राजकीय नेत्याचा उंबरा गाठून प्रपंचाचे गार्हाणे मांडले. त्यांनीही देवदया दाखवित दिवाळीपर्यंत त्यांना आहे तेथेच बसण्यास परवानगी दिली. आता दिवाळी होवून सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे, त्यातच भाजी बाजार भरवण्यासच मनाई आहे. असे असतांनाही येथील भाजी व्यापारी कोणाचेही ऐकण्यास तयार नसल्याने ‘त्या’ राजकीय आशीर्वादाने त्यांचा फुगलेला ‘बेडूक’ झाल्याचेच चित्र सध्या पहायला मिळत आहे.

