संगमनेरातील सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेच्या वस्तू! लाखोंचा खर्च व्यर्थ; कॅमेरे असलेल्या चौकातूनच दुचाकी होताहेत गायब..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठा गाजावाजा करुन आणि त्यावर लाखोंची उधळण करुन शहरातील प्रमुख मार्गावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्या प्रभावी वापराच्या अभावाने शोभेच्या वस्तू बनले आहेत. विशेष म्हणजे बसस्थानक, तीनबत्ती चौक व अकोले रोड चौफुली अशा वर्दळीच्या ठिकाणी उच्चतंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवूनही चोरटे त्या देखत लोकांच्या दुचाकी घेवून सुसाट होत आहेत. मात्र पोलिसांकडून या कॅमेर्‍यांद्वारे होणारे प्रक्षेपणच बघितले जात नसल्याने सध्या संगमनेरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ सुरु आहे. मंगळवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या असून त्यात एका बुलेटचाही समावेश आहे.


गेल्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाकडून आलेल्या निधीचा वापर करीत शहरातील प्रमुख चौेकांसह विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि बसस्थानक, अकोले रोड व 133 केव्ही उपकेंद्राजवळ मोठ्या प्रमाणात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. शहरातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासह शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी यासर्व कॅमेर्‍यांद्वारे चित्रीत होणारे छायाचित्रण थेट शहर पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेल्या मोठ्या आकाराच्या दूरचित्रवाहिनी संचावर दिसण्याचीही सुसज्ज व्यवस्था करण्यात आली. त्याला कॅमेर्‍यांचा ‘नियंत्रण कक्ष‘ असे गोंडस नाव देवून तो उभारण्यासाठीही लाखांचा खर्च केला गेला.


या कॅमेर्‍यांमध्ये अकोले रोड चौफुली, महात्मा फुले चौक, तीनबत्ती चौक, मोमीनपूरा, सय्यदबाबा चौक व बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले कॅमेरे उच्चतंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. यातून शहरातील चोर्‍या व विशेष करुन दुचाकी चोर्‍या आणि गंठण लांबविण्याचे प्रकार नियंत्रणात यावेत असे अपेक्षीत असतांना आजवर तसे काही घडल्याचे दिसून येत नाही. त्यातही कहर म्हणजे यासर्व गोष्टी चोरट्यांना माहिती असल्यागत आता त्यांनाही या कॅमेर्‍यांचे भय राहीले नसल्याचे मंगळवारी (ता.23) शहराच्या वेगवेगळ्या तीन ठिकाणांहून चोरीला गेलेल्या तीन मोटर सायकलवरुन स्पष्टही झाले आहे.


यातील पहिल्या घटनेत शनिवारी (ता.20) मालदाडवरील रघुनाथ गोविंद नवले (वय 61) हे कामानिमित्त बसस्थानकात आले असता त्यांनी आपली बजाज प्लॅटीना (क्र.एम.एच.17/बी.ई.7732) दुचाकी स्थानकातील गॅरेजजवळ उभी केली. काही वेळाने ते पुन्हा आपल्या दुचाकीजवळ आले असता त्यांना ती तेथे आढळून आली नाही. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता ‘दोन दिवस थांबा व आसपास शोधा’ असे आश्‍चर्यकारक उत्तर त्यांना देण्यात आले. मात्र कोणत्याही पोलीस अधिकार्‍याने अथवा कर्मचार्‍याने सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या समोरुन चोरट्याने लांबवलेली त्यांची दुचाकी हुडकण्याचा प्रयत्न केला नाही.


दुसर्‍या घटनेत ताजणे मळ्यात किराणा दुकान चालविणार्‍या हबीब अब्दुलकरीम तांबोळी (वय 48) यांच्या बाबत घडला. या घटनेत त्यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली त्यांची क्लासिक बुलेट (क्र.एम.एच.17/सी.ई.6475) ही महागडी दुचाकी शनिवारीच (ता.20) कोणीतरी अज्ञात चोरट्याने गायब केली. तर तिसर्‍या घटनेतही सीसीटीव्ही समोरुनच तीनबत्ती चौकातील मसल मॅजीक जीमसमोरुन सय्यदबाबा चौकात राहणार्‍या अमान फारुक बेपारी (वय 20) या तरुणाची होंडा शाईन (क्र.एम.एच.17/सी.के.0438) कोणीतरी अज्ञाताने लांबविली. या तिनही घटनांची नोंद मंगळवारी (ता.23) शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


वर्षभरापूर्वी शासनाच्या निधीतून शहराच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्याचा सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला. त्यातून शहरातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवणे अपेक्षीत असतांना पोलिसांकडून मात्र त्यांचा कधीही प्रभावी वापर केला गेल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या करातून खर्च करण्यात आलेल्या या सीसीटीव्हींची अवस्थाही 35 लाखांच्या सिग्नल यंत्रणेसारखी झाली असल्याचे दिसून येत आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 118407

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *