साकुर पठार भागात विकास कामातून परिवर्तन घडवणार : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, साकुर 
पहिल्या टप्प्यामध्ये  साकुर पठार भागासाठी जवळ जवळ ४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी दिला आहे. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात सुद्धा भरघोस निधी दिला जाईल. अनेक वर्षापासून  प्रलंबित राहीलेला  साकुर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबतचा  सर्वे जलसंपदा विभागाच्या वतीने केला  गेला आहे. त्यामुळे साकूर पठार भागाला पाणी देणार असल्याचा  विश्वास व्यक्त करतांना साकुर पठार भागात विकास कामांच्या माध्यमातून परिवर्तन घडवणार असल्याचे सुतोवाच आ.अमोल खताळ यांनी जांबुत येथे पत्रकारांशी बोलतांना  केले.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठारातर्गत येणाऱ्या पायरवाडी, गिरेवाडी, सुतारवाडी, शेंडेवाडी अंतर्गत येणाऱ्या सतीचीवाडी व दारसोंडवाडी, कर्जुले पठारतर्गंत येणाऱ्या  गुंजाळवाडी पठार, मांडवे येथील वाडेकर वस्ती, शिंदोडी, बिरेवाडी आणि जांबुत  या भागातील रस्ते मजबुतीकरण, काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक शाळा खोली  व खुली व्यायामशाळा या सर्व विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन करण्यासाठी आ. खताळ साकुर पठार भागात आले होते, त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी पठार भागातील वाडी वस्तीवर आलो होतो. निवडून आल्यानंतर विकास कामे घेऊनच गावागावातील जनतेचे आभार मानू असा निर्धार केला होता. त्यानुसार निधी मिळविण्यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा केला आणि निधी मिळाला. या निधीच्या माध्यमातून काही विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन  करायचे होते ते केले आहे.  साकुर पठार भागात आम्ही विकास कामांच्या माध्यमातूनच परिवर्तन करून दाखवू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, खांबा गावचे सरपंच रवी दातीर, रऊफ शेख, बुवाजी खेमनर, इसाक पटेल, सुभाष पेंडभाजे, रवींद्र दातीर, सुभाष भुजबळ, अमृता कोळपकर, अमित धुळगंड, संदीप खिलारी, रवींद्र भोर, किरण भागवत, मारुती आगलावे, हिवरगाव पठारचे उपसरपंच गजानन खाडे, बाळासाहेब वनवे, राजू गोसावी, संतोष वनवे,  पांडुरंग शेटे,  रावसाहेब गागरे, सुरेश भागवत, बाळसाहेब झिटे यांच्यासह साकुर पठार भागातील  महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून नुसत्या लढणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहोत.  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आम्ही एकत्रित बसून जो कोणी उमेदवार देऊ त्याच्या पाठीमागे महायुतीचे कार्यकर्ते भक्कम उभे राहणार आहेत असा विश्वास आ.खताळ यांनी यावेळी दिला.
Visits: 80 Today: 2 Total: 1099350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *