तालुक्यात पावसाचे धुमशान!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रात्रभर चाललेल्या संततधार पावसाने तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातील पिके सडण्याची शक्यता निर्माण झाली असून ‘कही खुशी कभी गम’ अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

शहरासह ग्रामीण भागात पाऊस सुरू असल्याने शेतकरी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात पावसाचा सामना करावा लागत आहे. शेतांमध्ये पाणीच पाणी असल्याने जनावरांचा चारा काढणेही मुश्किल झाले आहे. काही गावांमध्ये संततधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः टोमॅटो, कांदा, मका, सोयाबीन,कपाशी या पिकांना पावसाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.मात्र, दुसरीकडे या पावसामुळे कोरड्या जमिनीला ओलावा मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पाण्याचा तुटवडा असलेल्या भागांमध्ये हा पाऊस वरदान ठरला असून, धरण क्षेत्रातही पाण्याची वाढ झाली आहे.
काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतुकीत अडचणी आल्या. काही भागांत घरात पाणी शिरल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची तयारी सुरु असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.ग्रामीण भागातील शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंता व आनंद या दोन्ही भावनांच्या फेऱ्यात अडकले.
मुख्य रस्ते, गल्ली-बोळ आणि बाजारपेठेतील परिसरात पावसाचे पाणी वाहत असल्याने मोटारसायकलस्वार, पादचारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी गाड्या बंद पडल्या. वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या पावसाने शेतांमध्ये पाणी साचले. यामुळे टोमॅटो,कपाशी, कांदा, मका आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आधीच बाजारात दर घसरलेले असताना नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Visits: 94 Today: 3 Total: 1103110
