कामोन्मादी पोलीस निरीक्षक प्रताप दराडेवर अत्याचाराचा गुन्हा! पोलीसदलाची लक्तरे पुन्हा वेशीवर; मुंबईतील तरुणीची तोफखान्यात तक्रार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेवून ‘धाक’ निर्माण करणार्‍या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे याचा खरा चेहरा आता समोर आला आहे. मूळच्या पश्‍चिम बंगालमधील मात्र सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका 30 वर्षीय तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कोतवालीचा पदभार असलेल्या दराडेने लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सात वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनीही शेवगावमध्ये कार्यरत असताना अशाचप्रकारे एका महिलेवर अत्याचार केला होता. त्यावेळी ओमासे नावाचा हा लंपट अधिकारी ‘त्या’ महिलेच्या शेतात शासकीय वर्दीसह पाणी भरीत असल्याची छायाचित्रेही व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीसदलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. प्रताप दराडेच्या दूष्कृत्याने ‘त्या’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून या घटनेने राज्याच्या पोलीसदलात मात्र खळबळ उडाली आहे.


याबाबत सोमवारी (ता.22) पश्‍चिम मुंबईतील एका 30 वर्षीय तरुणीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मूळच्या पश्‍चिम बंगालमधील हुगळी येथे राहणारी ही तरुणी कोविड संक्रमणापूर्वी 2019 मध्ये कामानिमित्ताने मुंबईत आली होती. मार्च 2023 मध्ये एका ओळखीतील व्यक्तिच्या मार्फत तिला ‘सिल्करुट’ नावाच्या आस्थापनेत ग्राहक स्वागत अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. मात्र त्यानंतर काही काळातच तिला कनिष्ठ व्यवस्थापक आणि नंतर मुख्य सरव्यवस्थापक म्हणून बढतीही मिळाली. याच काळात ती अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक प्रताप पांडूरंग दराडे याच्या सतत संपर्कात होती.


त्याचा पुरेपूर फायदा घेत दराडे याने तिच्याशी जवळीक वाढवली व आपण महाराष्ट्र पोलीसदलात कार्यरत असल्याची माहिती देत तिचा विश्‍वास संपादन केला. दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये दराडे याने तिला पालघर जिल्ह्यातील मानोर येथील आपल्या फार्महाऊसवर नेले. त्यावेळी दोघांमध्ये पहिल्यांदा शारीरिक संबंधही प्रस्थापित झाल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारानंतर दोघांमधील संपर्क वाढलेला असतानाच वर्षभरातच पीडित तरुणीला दराडेचे अन्य महिलांसोबत संबंध असल्याचा संशय आल्याने जुलै 2024 मध्ये पीडितेने अचानक मानोरच्या फार्महाऊसवर जावून पडताळणी केली. त्यावेळी प्रताप दराडे अन्य दोघा तरुणींसोबत असल्याचे पाहिल्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार वादावादीही झाली.


त्यावेळी दराडेने पीडितेची समजूत घालीत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिला कामावर रुजू राहण्याबाबतही सांगण्यात आले. मात्र या घटनेनंतर सदरचा प्रकार आपल्या अंगलट येणार याची पोलीस असलेल्या दराडेला पुसटशी कल्पना आल्याने त्याने पीडितेशी असलेला संपर्क कमी करण्यासह तिला टाळण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ करीत ‘झाले ते विसरुन जा’ असे सांगत वर्षभर तिचा उपभोग घेतल्यानंतर तिला वार्‍यावर सोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडितेने त्याला विरोध केला असता दराडेने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीतीही घातली. या प्रकाराने घाबरलेल्या ‘त्या’ तरुणीने अखेर सोमवारी (ता.22) अहिल्यानगरला येवून तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


त्यावरुन पोलिसांनी सध्या अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रताप पांडूरंग दराडे (रा.अकोले, ता.इंदापूर) याच्या विरोधात शून्य क्रमांकाने फसव्या मार्गाचा अवलंब करुन अत्याचार केल्याच्या कलम 69 सह भारतीय दंडसंहितेच्या 351, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तो मानोर (जि.पालघर) पोलिसांकडे वर्ग केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दराडे याला नियंत्रण कक्षात पाचारण करण्यात आले. मात्र त्याने पोलीस अधिक्षकांची भेट घेत त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना सदरील महिलेने वेळोवेळी आपल्याकडून उसनवारी पैसे घेतले व ते परत करण्याचे सोडून एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा अन्यथा अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा तक्रारअर्ज दाखल केला. मात्र हा प्रकार स्वतःची अब्रु वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.


सात वर्षांपूर्वी असाच धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला होता. शेवगांवचे तत्कालीन स्त्री लंपट पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी घरात घुसून शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार तेथील एका महिलेने तत्कालीन पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे केली होती. त्यावेळी ओमासे नावाचा हा अधिकारी शासकीय गणवेशासह कंबरेला सर्व्हिस रिव्हॉल्वर अडकवून शेताला पाणी देत असल्याचे छायाचित्रही प्रचंड व्हायरल झाले होते. ज्या शेतात हा अधिकारी पाणी भरीत होता, ते शेत ‘त्या’ प्रकरणातील तक्रारदार महिलेचे असल्याचीही चर्चा त्यावेळी समोर आली होती.


त्यावेळीही ओमासेंना आपण फसल्याची जाणीव झाल्याने त्यांनी अत्याचाराची तक्रार दाखल होण्यापूर्वी एक दिवसआधी 12 ऑगस्ट 2018 रोजी पीडित महिलेच्या पती विरोधात आपल्याच पोलीस ठाण्यात शिवसंग्रामचे दिवंगत संस्थापक विनायक मेटे यांचा आवाज काढून 6 लाख 20 हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचा व विद्यानगरमधील (शेवगाव) त्यांच्या त्यावेळच्या राहत्या घरातून दोन शासकीय गणवेश (वर्दी), टोपी व बूट चोरीला गेल्याची तक्रार नोंदवून त्या घटनेपासून अंतर राखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी या लंपट अधिकार्‍याची सर्व्हिस रिव्हॉल्वरही ‘गायब‘ झाले होते, विशेष म्हणजे या प्रकारानंतर काही दिवसांनी या महाशयांनी पीडिता आणि तिच्या पतीचे हातापाया पडून रिव्हॉल्वर पुन्हा मिळवले व आपली नोकरी वाचवली. मात्र त्या घटनेने जिल्हा पोलीस दलाची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली होती, त्याची पुनरावृत्ती प्रताप दराडेच्या रुपाने पुन्हा एकदा झाली आहे.


सदरील महिलेने ओळखीचा फायदा घेत आपल्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगून लाखों रुपये घेतले आहेत. आताही सदरची महिला एक कोटी रुपयांची मागणी करीत असून ती पूर्ण केली नाही तर बलात्काराच्या तक्रारीसह पोलीस खात्यात बदनामी करण्याची धमकी देत मानसिक त्रास देत आहे. या महिलेला अशा प्रकारचे आरोप करण्यासाठी पोलीस दलातील कोणीतरी प्रवृत्त करीत असल्याचा आपणास संशय आहे. आजवर या महिलेले दिलेले पैसे आणि तिने वेळोवेळी आपणास केलेले मेसेज यांचे स्क्रिनशॉट आपल्याकडे उपलब्ध असून पोलीस अधिक्षकांनी संबंधित महिला व तिला ब्लॅकमेल करण्यासाठी मदत करणार्‍या अनोळखी व्यक्तिचा शोध घेवून चौकशी करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.
प्रताप दराडे
आरोपी पोलीस निरीक्षक

Visits: 194 Today: 1 Total: 1416341

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *