संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांचा विदर्भ दौरा सुरु

नायक वृत्तसेवा, अकोले
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे केंद्र असलेल्या विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी आणून निर्णायक लढा उभारण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे नेते विदर्भ दौरा करत असून महात्मा गांधींच्या सेवाग्राम येथून या दौऱ्याची बुधवार पासून सुरुवात करण्यात आली.
शेतकरी नेते राकेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे, विजू कृष्णन इत्यादी २३ राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. पंजाब, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा आदी राज्यांमधून आणि अर्थात महाराष्ट्रातून या दौऱ्यात शेतकरी नेते सहभागी झाले आहेत.
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी संवाद, गावोगावी शेतकऱ्यांशी संवाद, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी, पत्रकार परिषदा, शेती अभ्यासकांशी चर्चा व वर्धा, अमरावती व अकोला येथे जाहीर सभा असे या दौऱ्याचे स्वरूप असणार आहे.दौऱ्याच्या सुरुवातीला शिष्टमंडळाने नागापूर या गावी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
वर्ध्यात या दौऱ्याची पहिली सभा सत्यनारायण वाचनालय सभागृहात संपन्न झाली. सभेला राजेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे, विजय जावंधिया, विजू कृष्णन, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, परमितसिंग मेहमा,  किशोर ढमाले, आदींनी  शेतकऱ्यांना संबोधित केले.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला रास्त भाव, जमीन अधिग्रहणाला विरोध, शेतकरी हिताचा पीक विमा या किमान समान मागण्यांवर सर्व समविचारी शेतकरी नेत्यांना एकत्र आणण्याचा व सर्वांच्या सामूहिक नेतृत्वात राज्यात आरपार आंदोलन उभे करण्याचा संकल्प करण्यात आला.यशवंत झाडे, अविनाश काकडे, उमेश देशमुख, सुनील मालुसरे, भैय्या देशकर, शाम भेंडे, गोपाल दुधाने, महेंद्र मुनेश्वर, प्रवीण भोयर, अमीर अली अजानी, रेखा झाडे, दुर्गा काकडे, सुनील घिमे, चंद्रकांत ढगे, अतुल शर्मा, जितेंद्र चोपडे आदींनी पहिल्या दिवशीचा दौरा व सभा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
उत्तर भारतात ज्या प्रकारे शेतकरी आंदोलन करतात, त्याच चिकाटीने महाराष्ट्रातील शेतकरी लढत आहेत. राज्यात या निमित्ताने जे शेतकरी आंदोलन उभे राहील त्याला संपूर्ण ताकद देण्याची घोषणा यावेळी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश  टिकैत यांनी केली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आणि सर्वच शेतकरी-कामगारांवर ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धाचा अत्यंत विपरीत परिणाम होणार आहे. त्यावर मोदी सरकारने कापडावरील आयात कर रद्द करून आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे काम केले असल्याची टीका डॉ. अशोक ढवळे यांनी केली. 
Visits: 32 Today: 3 Total: 1101575

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *