पंचायतराज अभियानात सहभागी व्हा : आ. खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजकीय गट तट आणि मनभेद विसरून मुख्यमंत्री पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायतींनी  सहभाग नोंदवून बक्षीसे मिळवावीत असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी  केले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  जन्मदिवसाचे औचित्य साधून  तालुक्यातील निमोण  येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  व्यासपीठावर संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामराव कडलग,निमोणचे सरपंच संदीप देशमुख, उपसरपंच रवी गाडेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती घुगे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने संपूर्ण राज्यामध्ये सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचाच हा एक भाग म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री पंचायतराज अभियान  राबविले जात आहे. या अभियानात निमोण ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन  अभियान सुरू होण्याच्या अगोदरच जवळजवळ ७५ गुण मिळविलेले आहेत.मात्र आता २५ गुण बाकी आहेत, त्या गुणांसाठी सुद्धा तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील आणि ते तुम्ही निश्चित घ्याल आणि बक्षीसही मिळवाल यात कुठलीही शंका नसल्याचे आ. खताळ यांनी स्पष्ट केले. इतरही ग्रामपंचायतींनी एकमेकातील मतं आणि मनभेद दूर करून या अभियानात सहभागी होऊन बक्षीस मिळवावे असे आवाहन करून आ.खताळ म्हणाले,  तालुक्यातील  बहुतेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात नसल्या तरी आपण निधी देतांना कुठलाही भेदभाव करणार नाही. सर्व ग्रामपंचायतींना कसा निधी देता येईल यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे आ. खताळ यांनी यावेळी सांगितले.
लाडक्या बहिणीना नुसतेच  १५००  रुपये देऊन सरकार थांबणार नाही, तर त्या आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम होतील यासाठी  राज्य सरकारने  महिलांसाठी पतसंस्था सुरू करण्याचे धोरण घेतले आहे. त्या दृष्टीने संगमनेरमध्ये लवकरच  फक्त महिलांसाठी पतसंस्था सुरू करणार असल्याची घोषणा आ. अमोल खताळ यांनी यावेळी केली.
Visits: 27 Today: 2 Total: 1110172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *