निश्चित ध्येय बाळगून पोलीस उपअधीक्षक झालेले राहुल मदने! ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा असा थक्क करणारा जीवनप्रवास..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानवी जीवनाला दिशा मिळण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असते, मात्र शिक्षण म्हणजेच सर्वस्व असेही नाही. ज्याला आपल्यातील उपजत गुणांची ओळख पटली, तो शिक्षणाशिवायही जीवनात आभाळाएवढे यश मिळवू शकतो. मात्र नैसर्गिक उपजत गुणांना चांगल्या शिक्षणाची जोड मिळाली तर उत्तमच नव्हे तर काहीतरी भन्नाटच घडते हे सिद्ध केले आहे संगमनेरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी. अगदी बालवयापासून मैदानाशी गट्टी करणार्या या तरुण अधिकार्याने पदवीपूर्वीच पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली होती, मात्र मोठं स्वप्नं उराशी असल्याने त्यावर समाधानी न होता त्यांनी मैदानाशी असलेले नाते कायम ठेवीत कठोर परिश्रमाने अखेर आपल्या मनातील जागा पटकावलीच. आज ते संगमनेरसारख्या मोठा आवाका असलेल्या उपविभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी..
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेले कालठण हे राहुल मदने यांचे मूळ गाव. वडील पेशाने शिक्षक आणि त्यातही उत्कृष्ट मल्लखांबपटू असल्याने लहानपणापासून शिक्षण आणि खेळ या दोन्ही प्रकारांची त्यांना आवड जडली. अगदी लहान असताना शाळेत जाता-येता रस्त्यावरील एखादा धोंडा उचलायचा आणि तो किती लांबवर फेकता येतो याची पडताळणी करायची असा त्यांचा नित्यक्रम होता. पुढे शालेय जीवनात जेव्हा क्रीडा प्रकार समोर आले तेव्हा त्यांच्यात याच धोंडा फेकीतून गोळाफेकीचे आकर्षण निर्माण झाले, आणि यातच ते रमले.
गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फलटणमधील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र येथपर्यंतच्या प्रवासात त्यांचे शिक्षणापेक्षा खेळातच अधिक लक्ष असल्याचे निरीक्षण नोंदवित त्यांच्या वर्गशिक्षकांनी ‘तुझ्या शैक्षणिक आयुष्याचे काही खरे नाही..’ असे सांगत त्यांना खेळाकडून शिक्षणाकडे वळवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र त्यांनी त्याला महत्त्व देण्यापेक्षा आपल्या खेळाकडेच अधिक लक्ष्य केंद्रीत केले आणि क्रीडा प्रकारात दुर्लक्षित असलेल्या गोळाफेकीत विशेष नैपुण्य प्राप्त केले. शालेय जीवनात असतांना त्यांनी अगदी स्थानिक स्पर्धेपासून राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली.
पदवीच्या दुसर्या वर्षात असताना ते राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीत असल्याने त्यांना सात विषयांतील पाचमध्ये ‘नापास’ व्हावे लागले होते. मात्र तरीही त्यांचा गोळाफेकीचा नाद काही सुटला नाही. त्या दरम्यानच त्यांना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. गोळाफेकीतील त्यांचे नैपुण्य पाहून क्रीडा विभागाने त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी राहुरी येथे पाठविले. ही घटना राहुल मदने नावाच्या महाविद्यालयीन युवकाच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. प्रशिक्षण स्थळावरील वातावरण, प्रशिक्षण देणारे शिक्षक आणि तेथेच प्रशिक्षण घेणारे आणि सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सहकारी खेळाडू यांच्या सहवासातून त्यांना निश्चित दिशा मिळाली. राहुरीतील प्रशिक्षणाचा कालावधी आटोपून ते पुन्हा पुण्यात परतले ते निश्चित ‘ध्येय’ सोबत घेवूनच.
पुण्यात त्यांनी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी सुरू केली. मात्र दरम्यानच्या कालावधीत ते अनेक दिवस महाविद्यालयातील वर्गांना अनुपस्थित राहिल्याने शिक्षकवृंद त्यांना ‘तुझे काही खरं दिसतं नाही’ असं म्हणत दुषणं देवू लागले. मात्र त्याने विचलित न होता त्यांनी ध्येयाच्या दिशेने सुरु केलेला प्रवास तसाच सुरु ठेवला आणि ते पोलीस उपनिरीक्षकपदाची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र तोपर्यंत त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण नसल्याने त्यांना तोंडी परीक्षा देता आली नाही. मुळी त्यांचे लक्ष्य ते नव्हतेच, त्यामुळे या अपयशाला न डगमगता ते लढत राहिले आणि सोबत गोळाफेकीची हौसही भागवत राहीले.
2009 साली त्यांनी बीएस्सी अॅग्रीची पदवी घेवून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करताच पुढच्या सहा महिन्यांतच ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र त्यांना जागा मिळाली मुख्य कार्यकारी अधिकार्याची, जी त्यांना नको होती. त्यामुळे त्यांनी आपले क्रीडाकार्ड खेळले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. त्यावेळी क्रीडा विभागातून येणार्या खेळाडूंसाठी पोलीस उपअधीक्षकपदाची एकमेव जागा राखीव होती, आणि राहुल मदने या तरुणाशिवाय त्यावर दावा करणारा दुसरा कोणीही नसल्याने त्यांच्या मनातील ध्येय त्यांना समोर दिसले आणि त्यांनी ते मिळवलेही.
इंदापूर तालुक्यातील छोट्याशा गावातील एका शिक्षकाचा हा मुलगा पोलीस उपअधीक्षक झाला याचे अख्ख्या गावाला कौतुक वाटले. कारण गावातून शासकीय अधिकारी होण्याचा पहिला बहुमानही त्यांनी मिळविलाच होता. घरातून क्रीडा आणि शिक्षण या दोहींचे बाळकडू मिळवून ‘जे ठरवलं, ते करुन दाखवलं’ असं म्हणतं जेव्हा या तरुण अधिकार्याने खाकी वर्दीत गाव गाठलं तेव्हा अख्खं गावचं त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभं होतं. आई-वडील, शिक्षिका असलेली एक आणि सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक असलेली एक अशा दोन बहिणी. दोघीही उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. सामान्य कुटुंबातून केवळ ध्येय सोबत घेवून शिक्षणातील चढ-उतार अनुभव करीत, राहुल मदने यांनी मिळविलेले यश नेत्रदीपक आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यांचा जीवनक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
ग्रामीणभागातील तरुणांना शासकीय सेवेत यश मिळत नाही असा न्यून बाळगून अनेक तरुण क्षमता असूनही प्रयत्नांच्या वाटेला जात नाहीत. माणसाने एखादे ध्येय बाळगले आणि ते प्राप्त करण्यासाठी केवळ त्याला परिश्रमांची जोड दिली तर जगात अशक्य असे काहीही नसते हे अनेक विद्वानांनी सांगितले आहे. मात्र मनातला न्यूनगंड अनेकांना त्यापासून परावृत्त करीत असतो. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांचा आजवरचा जीवनप्रवास अशा तरुणांना निश्चितच प्रेरणा देणारा ठरेल.