मोबाईल टॉवर व फाईव्ह जी सेवेचा प्रश्न सुटणार! आ.खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

नायक वृत्तसेवा, साकुर
तालुक्याच्या साकुर पठार भागातील मोबाईल टॉवर व फाईव्ह जी सेवेचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. यासाठीच्या आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने पठार भागातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील साकूर पठार व आसपासच्या डोंगराळ, आदिवासी भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कचा प्रश्न प्रलंबित आहे. डोळासणे, शेंडेवाडी, सतीचीवाडी, रणखांब, दरेवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, चौधरवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, वरशिंदे अशा गावांमधील सुमारे ३५ ते ४० हजार नागरिक, विद्यार्थी आजही मोबाईल नेटवर्क व डिजिटल सेवांपासून वंचित आहेत.
या गंभीर समस्येबाबत आ.अमोल खताळ यांनी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला असून उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, माहिती तंत्रज्ञान मंत्री अशिष शेलार यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा केली आहे. तसेच जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने टॉवर उभारणी व सेवांचा विस्तार करण्याची मागणी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच पाठविलेल्या पत्रामध्ये साकूर पठार भागातील मोबाईल टॉवर उभारणी व फाईव्ह जी सेवा सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले होते.या संबंधित पत्र ई-मेलद्वारेही आमदारांनी कंपनीला पाठवले आहे.जिओ कंपनीकडूनही या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून यावर तातडीने कार्यवाही केली जाईल असे त्यांनी कळविले होते.
 आता या प्रश्नावर विधानपरिषदेचे सदस्य श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. साकूर पठार व परिसरातील हजारो नागरिकांचा हक्काचा हा प्रश्न राजकारणासाठी नव्हे, तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष संघर्ष, पाठपुरावा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे आमदार अमोल खताळ  यांचे असल्याचे पठार भागातील जनतेने म्हटले आहे.
Visits: 194 Today: 1 Total: 1880864

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *