बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी! पिंपरणेची घटना; परिसरात दहशत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या पतीसोबत डाळिंब बागेत डाळिंब तोडत असताना शेजारच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. काल मंगळवारी सकाळी भरदिवसा तालुक्यातील पिंपरणे येथे ही घटना घडल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात सध्या बिबट्यांचे मानवावरील हल्ले वाढले आहेत.गत महिन्यात मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री तालुक्यातील रहिमपूर येथील अरुणाबाई रामनाथ शिंदे या ७० वर्षीय महिलेवर त्या झोपेत असताना बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केले होते. या घटनेत सदर महिलेचा एका हाताचा अंगठा ही बिबट्याने तोडला होता. त्याचबरोबर त्यांच्या गालावर खोलवर जखमा झाल्या असल्याने अद्यापही त्या संगमनेरातील एका खाजगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. त्यानंतर गुरुवार दि.११ सप्टेंबर रोजी मामाच्या घरी गेलेल्या पाच वर्षीय श्रीधर बंडू फड या चिमुकल्यावर आई, आजी आणि मामा सोबत असताना देखील सायंकाळच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना शेडगाव येथे घडली होती.

या घटना ताज्या असतानाच मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पिंपरणे येथील वाकचौरे वस्तीवर राहणाऱ्या अनिता रमेश वाकचौरे यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना जबर जखमी केले आहे. त्यांच्या गालावर व हातावर खोलवर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.ही घटना घडली तेव्हा अनिता पतीसोबत शेतात डाळिंब तोडत होत्या. त्यावेळी शेजारच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून हल्ला करत त्यांना जमिनीवर पाडले. घाबरलेल्या अनिताने आरडाओरड केली, त्यावेळी पती रमेश वाकचौरे शेजारीच असल्याने ते धावत आले. त्यांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली मात्र या घटनेत त्या जखमी झाल्या आहेत. लागोपाठच्या या घटनांनी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असून दिवसाही एकट्या दुकट्याने शेतात जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

Visits: 162 Today: 2 Total: 1114531
