मरणानंतरही वैष्णवी बघणार जग; दृष्टीहिनांसाठी केले नेत्रदान गुंजाळ परिवाराच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तिचा अपघात झाला आणि त्यात तिचे दुःखद निधन झाले. ही बातमी आईवडिलांसह नातेवाईकांना धक्का देणारी व डोळ्याला अंधारी आणणारी ठरली. तिच्या जाण्याने आता सर्वस्व गमावले. मात्र, अशाही कठीण प्रसंगात गुंजाळ परिवाराने मनावर दगड ठेवून आपली लाडकी कन्या वैष्णवीचे नेत्रदान झाले तर तिच्या डोळ्यांनी एखाद्या व्यक्तीला नक्कीच दृष्टी मिळेल आणि त्यारुपाने आपली वैष्णवीच हे जग पाहत राहील हा उदात्त हेतू डोळ्यामोर ठेवत नेत्रदान केले.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील वैष्णवी साहेबराव गुंजाळ हिचे अपघाती निधन झाले. मात्र तिचे डोळे चांगले होते म्हणून तिचे चुलते डॉ. अनिल गुंजाळ यांनी तिचे डोळे दान करत केले तर डोळे नसलेल्या एखाद्या व्यक्तीला दृष्टी मिळेल अन् तिची स्मृती कायमस्वरूपी जागृत राहील. त्यानुसार नेत्रदान करण्याबाबतचा विचार त्यांनी चुलत बंधू प्रा. भाऊराव गुंजाळ यांच्यासमोर मांडला. त्यांनी सुद्धा तत्काळ सहमती दिली.

चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शार्दुल देशमुख आणि मयत वैष्णवीचे चुलते डॉ. अनिल गुंजाळ यांनी तत्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रमोद म्हस्के व रेडओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पिशोरीलाल सचदेव यांच्याशी संपर्क साधून नेत्रदान करण्याची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. बधे यांनी क्षणाचाही विलंब न लावता अवघ्या एका फोनवर डॉ. राशी शर्मा, डॉ. सर्वेश व डॉ. अंकिता या तीन नेत्रतज्ज्ञांच्या पथकाला संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवून दिले. त्यांनी कौशल्यपूर्ण नेत्रदानाची प्रक्रिया करून मयत वैष्णवीचे डोळे काढून नेले आणि दृष्टी नसलेल्या व्यक्तीला तिचे डोळे बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या धाडसी निर्णयाबद्दल गुंजाळ परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आमची मुलगी गेली आहे पण तिच्या डोळ्यांनी एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीला जर दृष्टी मिळाली तर त्या व्यक्तीतच आम्ही आमची मुलगी पाहू आणि आम्हाला त्या व्यक्तीला भेटण्यात नक्कीच आनंद वाटेल.
– साहेबराव गुंजाळ (मयत वैष्णवीचे वडील)
