भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा आरतीवरुन खळबळजनक दावा! माजीमंत्र्यांना ‘त्या’ वक्तव्यांची आठवण; आप्पासाहेब खरेंनाही सुनावले खेडेबोल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानाच्या गणरायाची प्रथम आरती करण्याचा मान कोणाचा? यावरुन गणेश विसर्जनाच्या दिवसापासून सुरु झालेल्या राजकीय संघर्षात ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरे यांनी उडी घेतल्यानंतर आता भाजपनेही महायुतीचा मोर्चा सांभाळला आहे. माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अनेक खळबळजनक दावे केले असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘तुम्ही विसरलात’ असे म्हणतं त्यांनी दशकापूर्वी केलेल्या एका वक्तव्याचा हवाला दिला आहे. त्याचवेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरे यांच्या ‘तो’ अधिकार मंडळाचा या वक्तव्याचाही समाचार घेताना त्यांनी ‘गुरुवर्य आपण चुकलात’ अशा शब्दात त्यांना खडेबोल सुनावले आहेत. मानाच्या आरतीवरुन संगमनेरात रंगलेल्या या राजकीय नाट्यात आता एकामागून एका पात्राची भर पडू लागल्याने येणारे काही दिवस त्यावरुन संगमनेरच्या राजकारणाचा पारा चढण्याचीही शक्यता आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे गणपुले यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यात दोघा माजी नगराध्यक्षांसह पाच माजी नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख केल्याने माजीमंत्र्यांकडून त्यांचा हा दावा कशाप्रकारे खोडला जातो याबाबत आता उत्कंठा ताणली गेली आहे.


सोमेश्‍वर-रंगारगल्ली मंडळाने यावर्षी आपल्याच परंपरेला छेद देताना विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभी होणार्‍या आरतीसाठी पहिल्यांदाच दोन ताटांची व्यवस्था केल्याने आणि आजी-माजी आमदारांच्या शुभहस्ते एकाचवेळी आरतीही घडवून आणल्याने संगमनेरातील राजकारण तापले आहे. आरतीनंतर लागलीच त्याची परिणितीही दिसून आली. या प्रसंगातून लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा सूर खताळ समर्थकांमधून उमटल्याने आमदारांनी खरे प्रतिष्ठानतर्फे मानपत्र वितरणाचा कार्यक्रम टाळून ढोलपथकाच्या दिशेने मार्गक्रमण केले, त्यातून त्यांची नाराजीही दिसून आली. याबाबत त्यांनी उघडपणे भाष्य करताना लोकप्रतिनिधींच्या हस्ते आरतीची परंपरा असताना आणि गेल्या वर्षीपर्यंत आरतीचे एकच ताटं करण्याची पद्धत असताना यावर्षी बदल का? असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

त्यानंतर दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे सुरु होवून संगमनेरचे राजकीय वातावरण तापत असतानाच रंगारगल्लीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरे यांनी एका यू-ट्यूब वाहिनीशी बोलताना ‘आरतीसाठी कोणाला बोलवावे हा अधिकार मंडळाचा आहे’ असे सांगत या वादात उडी घेतली. 25 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण करुन देत त्यांनी त्यावेळी मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी मानाच्या गणपतीची मिरवणूक सकाळी सातपासून सुरु करण्यासाठी पुढाकार घेतल्याने पहिल्यांदाच आमदार म्हणून त्यांच्या हस्ते आरती केली गेली, त्यानंतर दरवर्षी त्यांच्याच हस्ते आरती करण्याची पद्धत सुरु झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्याला महायुतीकडून उत्तर मिळणार हे निश्‍चित असतानाच भाजपचे माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे संगमनेरच्या गणेशोत्सवावर झोत टाकला असून खरे यांनाही ‘गुरुवर्य तुम्ही चुकलात’ असे म्हणतं चुचकारले आहे.


याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गणपुले यांनी 2012 साली विसर्जनासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यावरुन झालेल्या आंदोलनाचा किस्सा सांगताना त्यावेळी मंत्री असलेल्या थोरात यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळासमोर झालेल्या चर्चेची आठवण करुन दिली आहे. त्यावेळी त्यांनी मानाच्या गणपतीची आरती करण्याचा मान स्थानिक आमदारांनाच असल्याचे वक्तव्य केल्याचे स्मरणही करुन दिले आहे. यावेळी गणपुले यांनी ‘तुम्ही विसरलात’ अशा शब्दात थोरात यांच्यावर खोचक टीकाही केली. विसर्जनासाठी नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी घेवून तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप पुंड, (स्व) राधावल्लभ कासट, किशोर पवार, सोमेश्‍वर दिवटे, कैलास वाकचौरे व नितीन अभंग यांच्यासह आपणही स्थानिक लोकप्रतिनिधी तथा तत्कालीन मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती असा दावा करताना त्यांनी त्यावेळच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेचा दाखलाही प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.


अहिल्यानगरला जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळातील तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी त्यावेळी नियोजित असलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन विसर्जनाचा दिवस समोर ठेवून सोडल्यास दोन्ही गोष्टी साध्य होतील अशी सूचना केली होती. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी थेट नगराध्यक्षांची अक्कलच बाहेर काढल्याने संगमनेरच्या गणेश विसर्जनाचा पेच निर्माण झाला. त्यातून नदीपात्रात पाणी असावे यासाठी आंदोलन उभे राहीले आणि त्याचे नेतृत्वही ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरे यांनीच केल्याची आठवण करुन देत गणपुले यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला.


त्यावेळच्या आंदोलनामुळे अनंत चतुदर्शीला संगमनेरातील गणपतींचे विसर्जन होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वरील शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केल्याचा दावा करताना अ‍ॅड.गणपुले यांनी त्यावेळी मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत नेमके काय झाले होते याचा तपशिल देण्याची वेळ आल्याचे सांगत खळबळ उडवणारा दावाही केला. या चर्चेत थोरात यांनी ‘आपणास अपेक्षेपेक्षा खूपकाही राजकीय यश मिळाल्याचा उल्लेख करीत, संगमनेरच्या गणेश विसर्जनात कोणतेही विघ्न येवू नये, आमदारांनी यावं, मानाच्या गणपतीची आरती करावी आणि उत्साहात मिरवणूक सुरु व्हावी’ अशी अपेक्षा व्यक्त करीत ‘भविष्यात आपण आमदार असो, अथवा नसो. त्यावेळीही आपण आरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू, आरतीचा पहिला मान मात्र त्यावेळच्या आमदारांचा असेल’ असे वक्तव्य त्यांनी केले होते असा दावा करीत त्यांनी जोरदार पलटवारही केला आहे.


थोरात यांच्या याच वक्तव्यावर निशाणा साधत अ‍ॅड.गणपुले यांनी राजकीयदृष्ट्या आमदार म्हणून संगमनेरच्या जनतेने तुम्हाला नाकारले आहे. हा पराभव तुम्ही स्वीकारल्याचे व्यासपीठांवरुन जाहीरपणे सांगत असलात तरीही तुमच्यासह तुमच्या समर्थकांना अद्यापही तुमचा पराभव पचनी पडलेला नाही. त्यातूनच अशाप्रकारची षडयंत्र रचली जात असून नूतन आमदारांशी बरोबरी करण्यासाठी अतिशय घृणास्पद प्रकार सुरु असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. यावर्षी आरतीसाठी पहिल्यांदाच दोन ताटं करण्याच्या प्रकरणाचा समाचार घेताना त्यांनी गेल्यावर्षी पर्यंत आमदारांसाठी एकच आरतीचे ताट करण्याची परंपरा असल्याकडेही लक्ष वेधले.


यावेळी दोन ताटं तयार करण्याच्या कृतीवर बोटं ठेवताना त्यांनी थोरात यांना उद्देशून आपले वय, चाळीस वर्षांच्या आमदारकीचा, मंत्रीपदाचा प्रदीर्घ अनुभव पाहता आपण मनानेही मोठे व्हायला हवे होते असा टोला देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. आपण मोठ्या मनाने आरतीचे एकच ताटं करा, जो आमदार असेल त्याच्या हस्ते पहिली आरती होईल असे अधिकार वाणीने सांगायला हवे होते असा खोचक सल्ला देण्यासही वकील महोदय विसरले नाहीत. आपण आपल्याच मालकीची संस्कृती समजून माजी असतानाही दुसरे ताटं हातात घेवून जो नवा दंडक घालण्याचा व प्रथा-परंपरा मोडण्याचा प्रयत्न केलात तो अतिशय चुकीचा असल्याची टीकाही अ‍ॅड.गणपुले यांनी केली.


दोन ताटांद्वारे पहिल्यांदाच झालेल्या आरतीवरुन निर्माण झालेल्या अभूतपूर्व प्रसंगावर भाष्य करीत सोमेश्‍वर रंगारगल्ली मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आप्पासाहेब खरे यांनी सारवासारव करताना ‘आरतीला कोणाला बोलवायचे याचा सर्वाधिकार मंडळाकडे’ असल्याचे वक्तव्य केले होते. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे अ‍ॅड.गणपुले यांनी त्याचाही जोरदार समाचार घेतला. ‘आप्पा, तुम्ही चुकलातच..’ असे म्हणत आरतीसाठी कोणाला बोलवावे याचा अधिकार मंडळालाच आहे, मात्र सोमेश्‍वर मंडळाचा गणपती एकट्या रंगारगल्लीचा नसून तो संपूर्ण शहराच्या गणेशोत्सवातील मानाचा पहिला गणपती आहे याचे स्मरण त्यांनी करुन दिले. म्हणूनच या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची पहिली आरती आमदारांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे व हा दंडकही आपणच घालून दिल्याची आठवणही त्यांनी प्रसिद्धीपत्रातून करुन दिली आहे.


आरतीचा मान कोणत्याही ‘व्यक्तिला’ नसून ‘पदाला‘ आहे. मंडळ कोणालाही आरतीसाठी निमंत्रण देवू शकते. परंतु पहिल्या आरतीचा मान त्या-त्या वेळच्या स्थानिक आमदारांनाच दिला पाहिजे. परंतु गुरुवर्य आप्पासाहेब, तुम्ही ती परंपरा मोडलीत आणि आता त्याचे लंगडे समर्थन करीत आहात, ते पाहुन इतकेच सांगावे वाटते, ‘आप्पा, तुम्ही चुकलात..’ असे म्हणतं अ‍ॅड.श्रीराम गणपुले यांनी आप्पासाहेब खरे यांनाही ‘गुरुवर्य’ संबोधतांना मृदूभाषेत खडेबोल सुनावले आहेत. त्यावरुन आता मानाच्या आरतीचा विषय चांगलाच चिघळण्याची शक्यता असून येणार्‍या काळात त्यावरुन राजकारण रंगण्याचीही चिन्हे आहेत.


130 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या संगमनेरच्या गणेशोत्सवात यंदा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींच्या मानापमानावरुन वाद निर्माण झाले. त्याचे दोन्ही बाजूने राजकीय पडसाद उमटत असतानाच रंगारगल्लीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरे यांनीही कोणाला बोलवावे याचा अधिकार निश्‍चित केल्याने आगीत तेल पडले. त्यावरुन सोमेश्‍वर मंउळातच दोन मतप्रवाह निर्माण झाले असतानाच भाजपने महायुतीचा बुरुज लढवताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आप्पासाहेब खरेंनाही विविध दाखल्यांसह जोरदार प्रत्यूत्तर दिल्याने थोरात सर्मथकांकडून त्याचा कसा प्रतिवाद केला जातो याबाबतची उत्कंठा ताणली गेली आहे.

Visits: 365 Today: 1 Total: 1413299

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *