बैलांच्या जाडीने वाचविले विहिरीत पडलेल्या बिबट्याचे प्राण
बैलांच्या जाडीने वाचविले विहिरीत पडलेल्या बिबट्याचे प्राण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या आभळवाडी येथील शेतकरी पोपट कापसे यांच्या विहिरीत बुधवारी (ता.14) सकाळी बिबट्या भक्ष्याच्या शोधात पडला होता. दरम्यान, काही शेतकर्यांनी शक्कल लढवत औताला बैलांना जुंपण्यासाठी असणार्या जाडीच्या माध्यमातून बिबट्याला वाचविण्यात यश मिळाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शेतकरी कापसे यांची गावाजवळच विहीर आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्याने विहिरीत निम्म्याच्या वर पाणी आहे. बुधवारी सकाळी बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना या विहिरीत पडला. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या काही शेतकर्यांनी बिबट्या विहिरीत पडल्याचे पाहून त्या दिशेने धाव घेतली. बराच वेळ झाल्याने बिबट्या पोहून थकला होता. ही वार्ता वार्यागत परिसरात पसरल्याने अनेकांनी बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीच्या कठाड्याजवळ गर्दी केली होती. त्यानंतर बिबट्याला वाचवण्यासाठी शेतकर्यांनी शक्कल लढवत औताला बैलांना जुंपण्यासाठी आवश्यक असणारी जाडी आणली. तिला दोन्ही बाजूंनी दोरी बांधत ती जाडी विहिरीत सोडली. काही वेळातच बिबट्या अलगदपणे जाडीवर विसावला.
तत्पूर्वी काही शेतकर्यांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना दिलेली होती. माहिती समजताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सवीता थोरात, योगिता पवार, दिलीप उचाळे, वनसेवक रोहिदास भोईटे, बाळासाहेब वैराळ, आनंथा काळे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर काढण्यासाठी वन कर्मचार्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला. आणि जाडीवर विसावलेल्या बिबट्याने थेट पिंजर्यात प्रवेश केला. सध्या या बिबट्याची रवानगी चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात केली आहे. दरम्यान बैलांची जाडी विहिरीत सोडली नसती तर बिबट्याचा मृत्यू झाला असता. मात्र शेतकर्यांच्या प्रसंगावधानतेने बिबट्याचे प्राण वाचले आहे.