‘अखेर’ संगमनेरच्या गणेश विसर्जनातून ‘डीजे’ हद्दपार! मेनरोडवरील व्यापार्यांच्या लढ्याला यश; अन्यथा यंत्रणा जप्तीचाही इशारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचा लोकोत्सव म्हणून मान्यता असलेल्या गणेशोत्सवात भक्ति आणि सामाजिक एकोप्याचे अनोखे दर्शन घडते. मात्र गेल्या काही दशकांत या उत्सवाला वेगळेच स्वरुप प्राप्त होत असून सार्वजनिक हिडीसपणा वाढीस लागला आहे. हल्लीच्या उत्सवात पारंपरिक वाद्यांना फाटा देत कर्णकर्कश आवाजाच्या डीजेकडे तरुणाईचा कल वाढला असून त्यातून अबालवृद्धांच्या समस्याही वाढल्या आहेत. सार्वजनिक उत्सवातील डीजेच्या वाढत्या वापरामुळे केवळ आवाजाचे प्रदूषणच नव्हेतर, मानवी जीवनावरील त्याचे भयंकर दुष्परिणामही आता समोर येवू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील मोठ्या उत्सवांमध्ये डीजेच्या वापराला मनाई करण्याची मागणी पुढे येत असतानाच संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील व्यापार्यांनी हिम्मत करुन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांवरच कारवाईची मागणी करीत यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत मेनरोडवर एकही डीजे वाजणार नाही अशी विनंतीही पोलिसांना केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत शहर पोलिसांनी गवंडीपूर्यापासून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत डीजे वाजवण्यास पूर्णतः मनाई केली आहे, आदेशाचे उल्लंघन करणार्या मंडळांवर कारवाईसह डीजेची संपूर्ण यंत्रणा जप्त करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे संगमनेरच्या यंदाच्या विसर्जन मिरवणुकीतून पहिल्यांदाच डीजे हद्दपार होणार असे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

राज्याच्या कोनाकोपर्यात मोठ्या भक्तिभावाने दहा दिवस उत्साहात साजर्या होणार्या गणेशोत्सवाला खूप मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात सामाजिक एकोपा वाढावा यासाठी लोकमान्य टिळकांनी पुण्यातून या उत्सवाच्या सार्वजनिक स्वरुपाची मुहूर्तमेढ केली. त्यानंतरच्या वर्षी
संगमनेरातील सोमेश्वर मंदिरात गणेश प्रतिष्ठापना होवून पुण्यातील उत्सव संगमनेरात पोहोचला आणि गेल्या 130 वर्षात घरोघरी आणि वाडी-वस्तीवर साजरा होवू लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्यासाठी त्याचा वापर झाला. तर, स्वातंत्र्योत्तर काळात दहा दिवसांच्या या उत्सवाला भक्तिचा साज चढायचा. मात्र अलिकडच्या काही दशकांत या उत्सवाचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण सुरु असून त्यातून सार्वजनिक हिडीसपणा वाढला आहे.

उत्सवाच्या दहाव्या दिवशी निघणार्या मिरवणुकांमधून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडायचे, ढोल-ताशाच्या तालावर झांझरी, लेझीम घेवून बेधुंद होवून नाचणारे गणेशभक्त दिसायचे. काही मंडळे टाळ-मृदूंगाच्या तालावर गणरायाचा जयजयकार करीत बाप्पांना निरोप देत. शहराच्या प्रमुख मार्गावरुन चौका-चौकातील गणेश मंडळांच्या मिरवणुका निघायच्या, त्यात परिसरातील अबालवृद्ध अगदी महिला व मुलीही सहभागी व्हायच्या.
अतिशय भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात निघणार्या या मिरवणुकांमधून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडायचे. मात्र अलिकडच्या काही दशकांत राज्यातील बहुतेक सार्वजनिक उत्सवांमध्ये धांगडधिंगा वाढला असून अंमलीपदार्थांच्या वापरासह बहुतेक मंडळांकडून सर्रासपणे कर्णकर्कश आवाजातील डीजेचा वापर होत असल्याने मिरवणूक मार्गावरील व्यापारी, रहिवाशी यांना असह्य झाले आहे.

न्यायालयांनीही वेळोवेळी ध्वनी प्रदूषणाबाबत सक्तिचे आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यात बहुतेक ठिकाणी आजही डीजेचा दणदणाट सुरुच आहे. संगमनेरातील गेल्या आठ दिवसांतील उत्सवातही त्याचा वापर दिसून आला असून शनिवारी
निघणार्या विसर्जन मिरवणुकीसाठी अनेकांनी डीजेचे आगाऊ बुकींगही करुन ठेवले आहे, मात्र अशा सर्व गणेश मंडळांना आता सावधानतेचा इशारा देण्यात आला असून संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील व्यापार्यांनी गणेश स्थापनेच्या दिवशी मेनरोडवर झालेल्या डीजेच्या दणदणाटाचा दाखला देत त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवालाही जोडण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने दोषी अधिकार्यांवर कारवाईची मागणी करतानाच या व्यापार्यांनी शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही मंडळाकडून डीजेचा वापर होवून रहिवाशांच्या आरोग्याचे विषय उद्भवणार नाहीत याची दक्षता घेण्याची विनंती अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेताना त्यांनी संगमनेरच्या व्यापार्यांची मागणी मान्य केली असून संगमनेरच्या मेनरोडवरील गवंडीपूरा ते संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा डीजे वाजवण्यास पूर्णतः बंदी घातली आहे.

पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणार्या मंडळावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून मनाई आदेश असतानाही मिरवणुकीसाठी डीजे उपलब्ध करुन दिल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून दिला गेल्याने डीजे मालकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी विसर्जनाच्या दिवशी घेतलेल्या बुकींग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या या आदेशानंतर अनेक मंडळांची धावपळही वाढली असून पारंपरिक वाद्य पथक आणण्यासाठी लाखांचा निधी कसा जमवावा असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. तर, या आदेशाने काही मंडळांचे ‘बजेट’च कोलमडल्याने त्यांच्याकडून विसर्जन मिरवणुकीचा बेतच रद्द होवू शकतो. यासर्व घडामोडीतून मेनरोडवरील व्यापार्यांनी दाखवलेल्या हिम्मतीमुळे संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीतून पहिल्यांदाच डीजे हद्दपार होणार हे मात्र निश्चित आहे.

मागील काही दशकांत गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या जागेवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजात हिडीसपणे नाचणारी तरुणाई असे बिभत्स चित्र बघायला मिळत होते. त्यातून अंमलीपदार्थांचा वापर वाढण्यासह कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होवू लागले होते. त्यातच डीजेचा सर्रास वापर वाढल्याने नागरी आरोग्याचे प्रश्नही निर्माण होवून अनेकांना हृदयविकार, बहिरेपणा यासारख्या समस्यांचा सामनाही करावा लागला. एखाद्या घटनेनंतर या विरोधात केवळ चर्चा व्हायच्या आणि काही दिवसांत थांबायच्या. मेनरोडवरील व्यापार्यांनी मात्र यावेळी या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करताना थेट श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधिक्षकांनाच गळ घातली, त्यांनीही डीजेचे मानवी आणि पर्यावरणाच्या आरोग्यावरील परिणामांचा विचार करुन विसर्जनाच्या दिवशी गवंडीपूरा ते नगरपालिका हा परिसर ‘डीजे मुक्त’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उल्लंघन करणार्यांवर कारवाईसह डीजे जप्तीचाही इशारा दिला गेल्याने यंदाच्या वर्षी संगमनेरातून ‘डीजे’ हद्दपार होणार हे निश्चित आहे.

