शिंदे-फडणवीस सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस! अकोलेत किसान सभेचा एल्गार; तीन दिवस अधिवेशन


नायक वृत्तसेवा, अकोले
शेतकर्‍यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर भारतीय किसान सभा आक्रमक झाली असून सभेने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार, तसेच केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकर्‍यांची तयार झालेली पिके पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभर 36 लाख हेक्टरवरील पिके बरबाद झाली आहेत. शेतकर्‍यांना अशा आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. शेतकर्‍यांच्या व सामान्य जनतेच्या मनात सरकारच्या या दुर्लक्षाच्या विरोधात तीव्र संताप खदखदत आहे, असे किसान सभेने म्हटले आहे.

सोमवारी (ता.31) अकोले येथे येथे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. त्यावेळी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून सभेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी किसान सभेने केंद्रातील मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. केंद्रातील मोदी सरकारही सातत्याने शेतकरीविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे धोरण राबवत आहे. देशभर यामुळे शेती संकट अधिक तीव्र होत असून शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी म्हटले आहे. एक वर्षभराच्या ऐतिहासिक व विजयी शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले. पण शेतकर्‍यांना कायदेशीर व रास्त आधारभाव, कर्जमाफी, सर्वंकष पीक विमा योजना, वाढीव पेन्शन, सिंचन, वीज, रेशन व अन्नसुरक्षा असे अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. दुसरीकडे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व इतर जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावे करणे हे सुद्धा जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर देशाची राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-सामाजिक न्याय यांचे संरक्षण आणि संवर्धन हे आज कळीचे प्रश्न बनले आहेत, असेही ढवळे यांनी पुढे म्हटले आहे.

दरम्यान, 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर असे तीन दिवस चालणार्‍या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह 65 राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रभरातून 23 जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडण्यात आलेले 300 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सलग तीन दिवस ओला दुष्काळ, शेती संकट व ज्वलंत शेतकरी प्रश्नांवर विचार विनिमय करून शेतकरी आंदोलनाच्या वाटचालीची पुढील दिशा निश्चित करणार आहेत. अधिवेशनापूर्वी 31 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकर्‍यांची भव्य रॅली संपन्न झाली. बाजारतळ अकोले येथून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामीण श्रमिक व ग्रामीण कामगार सहभागी झाले. शेतकरी रॅलीनंतर महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे जाहीर सभा घेण्यात आली.

Visits: 15 Today: 1 Total: 117938

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *