धांदरफळचा हल्ला झाला, तालुक्याने आमदार बदलला : मंत्री विखे-पा.आमदारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा; सुनियोजित कारस्थानाचाही गंभीर आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ला सुनियोजित कटाचा भाग असून सुर्दैवाने हल्लेखोराकडे कोणतेही शस्त्र नसल्याने मोठा अनर्थ टळला. अशाप्रकारच्या ठोकशाहीतून तालुक्याचे हिंदूत्त्व संपणार नाही. अशा प्रवृत्तीमुळेच तालुक्यातील जनतेने तुम्हाला घरी बसवल्याची शेलकी टीका करीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाव न घेता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. कालच्या घटनेतून तुम्ही लोकांच्या मनातूनही उतरला आहात, धांदरफळच्या घटनेनंतर तालुक्याने आमदार बदलला. आता, आमदारांवरील हल्ला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदल घडवणारा ठरेल असे भाकित वर्तवताना त्यांनी गुरुवारच्या आमदार हल्ला प्रकरणाचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी हल्ल्यानंतर आरोपीचे सोशल खाते बंद करण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगून विरोधकांकडून सोशल माध्यमात प्रसारीत झालेल्या संदेशांबाबतही शंका उपस्थित केली. यासर्व गोष्टी आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ला सुनियोजित असल्याकडे उंगलीनिर्देश करणार्‍या असल्याने त्याचा सखोल तपास करण्याचा सूचनाही पोलिसांना दिल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


संगमनेरचे आमदार अमोल खताळ गुरुवारी (ता.28) संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तेथील कार्यक्रम आटोपून ते बाहेर पडत असताना प्रेक्षकांमधील नागरिकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गर्दी केली. त्याचा गैरफायदा घेत आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेनंतर आमदार खताळ यांच्या अंगरक्षकासह मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी आरोपीला जेरबंद करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा निषेध म्हणून महायुतीच्यावतीने आज (ता.29) आमदारांच्या कार्यालयापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय भवनासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले, यावेळी ते बोलत होते. आमदार अमोल खताळ यांच्यासह विठ्ठल लंघे व महायुतीच्या सर्वच घटकपक्षांचे पदाधिकारी, मान्यवर व संघटनांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे-पाटील यांनी आमदार हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा तालुका दहशतीविरोधात एकवटल्याचे सांगत आपणही काय मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाहीत! या त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशा ठोकशाहीने तालुक्यातील हिंदूत्त्व कधीही संपणार नाही. अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा अनुभव तुम्हाला विधानसभा निवडणुकांमध्येही मिळाल्याची टीका करीत त्यांनी थेट नाव न घेता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दिशेने आपला रोख केला. आमदार अमोल खताळ यांच्यावरील घटनेने तुम्ही लोकांच्या मनातूनही उतरला आहात असा घणाघाती टोलाही त्यांनी दिला. ही घटना अचानक घडलेली नाही असे सांगताना त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य वाढवले. यामागील खर्‍या सूत्रधाराचा शोध घेण्याची गरज असून पोलिसांना त्याबाबत स्पष्ट सूचना दिल्याचेही मंत्री विखे-पाटील म्हणाले.


या प्रकरणात पोलीस अधिकार्‍यांकडून कुचराई झाली असेल तर त्यांनाही कारवाईचा सामना करावा लागेल असा इशारा देत त्यांनी या घटनेनंतर एकीकडे फ्लेक्स, सोशल माध्यमातील आरोपीचे खाते बंद करण्याचा प्रकार सुरु आहे, तर दुसरीकडे घटनेचा निषेध करणारे संदेश जाणीवपूर्वक पसरवून आपला त्याच्याशी संबंध नसल्याचे भासवले जातंय. या सगळ्या गोष्टी अतिशय संशयास्पद असून हा सगळा सुनियोजित कारस्थानाचा प्रकार असल्याचा गंभीर आरोपही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. धांदरफळ प्रकरणातही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता, तेव्हा तालुक्यातील जनतेने आमदारच बदलून टाकला. आतातर लोकप्रिय आमदारावरच हल्ला झाला आहे, त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळेल असे भाकीत वर्तवायलाही मंत्री महोदय विसरले नाहीत.


रात्री घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, मात्र तालुक्यासाठी नवीन नाही अशी कोपरखळी हाणताना पालकमंत्र्यांनी वर्षोनुवर्ष यांनी दहशत मुक्तीच्या नावाखाली तालुका दहशतीखाली ठेवल्याची टीका केली. विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करण्याचे प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला. एकप्रकारची दहशत निर्माण करुन लोकांना आपल्या पायाजवळ बसवण्याची वृत्ती चाळीस वर्ष जोपसली गेल्याचा घणाघातही त्यांनी केला. एका सामान्य शेतकर्‍याच्या पोराने आपल्याला धोबीपछाड दिल्याची गोष्ट अजूनही यांना पचनी पडत नसल्याची शेलकी टीका करताना पालकमंत्री विखे-पाटील यांनी इतकी वर्ष यांनी ठोकशाहीने राज्य केले, यांना लोकशाही मान्यच नसल्याने त्यांचा पराभव झाल्याचे सांगितले. हा पराभव स्वस्थ बसू देत नसल्यानेच आधी वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारावर आणि आता थेट आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याचे मात्र त्या विरोधात संगमनेरची जनता एकजूटपणे उभी राहील्याचे ते म्हणाले.


हे सगळे माथे फिरु आहेत, हल्लेखोराच्या हातात जर एखादे शस्त्र असते तर अनर्थ घडला असता. सत्ता गेल्यानेच हे सगळे घडत असल्याचा घणाघात करताना त्यांनी कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करुन आमदार अमोल खताळांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. महायुती विकासाच्या दिशेने घेवून जाणारी आहे, त्यामुळे शांततेचा मार्ग निवडा. एकाबाजूला आपल्याला दहशत मोडायची आहे. तर, दुसर्‍या बाजूला सुरु असलेला विकास न्यायचा आहे. व्यापार्‍यांनीही निर्भयपणे व्यापार करा, त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करणार्‍यांची जबाबदारी आपली आहे असे म्हणत त्यांनी संगमनेरातील खंडणीखोरांवरही निशाणा साधला.


यावेळी आमदार खताळ म्हणाले की, असल्या भ्याड हल्ल्याने आपण एक इंचही मागे हटणार नाही, आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे. अशा हल्ल्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरात सभा आणि वाहनफेरी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या मेळाव्यातून रोजगार, आरोग्यासह आपण विविध मागण्या केल्या. एक शेतकर्‍याचा मुलगा आमदार झाला हे जनतेने स्वीकारले आहे, मात्र पराभूत उमेदवार हे स्वीकारायला तयार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी भावूक होताना माझे काही चुकते का? असा सवाल केला. गेली 40 वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न आपण कमी कालावधीत मार्गी लावतोय असे सांगून ते म्हणाले की, पाण्याचा प्रश्न जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण सोडवला आहे, त्यामुळे काहीजण आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


आपल्या जीवात जीव असेपर्यंत संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी काम करणार असल्याची ग्वाही देताना त्यांनी संगमनेरकरांनी आपल्याला प्रेम दिलंय, एका सामान्य शेतकर्‍याच्या मुलाचा सन्मान केलाय, या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी साठ/सत्तर आमदारांनी फोनवरुन घटनेची माहिती घेत निषेध केल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोश आहे, हा उत्सव सालाबादप्रमाणे आनंदाने साजरा करायचा आहे. आभार मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास परिणमांचा इशारा आपण दिला होता अशी आठवण सांगत आमदार खताळ यांनी विरोधकांनी आपला ट्रेंड बदलून थेट आमदारावरच हात उगारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

Visits: 162 Today: 2 Total: 1114526

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *