आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याने तरुणाई संतप्त! पोलिसांकडून हल्लेखोर ताब्यात; मात्र जमाव हटण्यास तयार नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचा सांस्कृतिक मानदंड ठरलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यक्रम स्थळावरून निघालेल्या आमदार अमोल खताळ यांच्यावर एकाने अचानक हल्ला करण्याचा प्रकार सायंकाळी समोर आला होता. या घटनेनंतर हल्लेखोर प्रसाद बापूसाहेब गुंजाळ (वय 22, रा. खांडगाव, ता. संगमनेर) या तरुणाला आमदार खताळ यांच्या अंगरक्षकासह खाजगी सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेत कार्यालयात कोंडले व याबाबत पोलिसांना कळवले. मात्र त्यापूर्वीच कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिकांसह काही वेळातच शेकडो नागरिक घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जाणेही धोक्याचे ठरत आहे. सध्या परिसरात मोठ्या संख्येने तरुण जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे, आमदार खताळ यांनीही तेथे भेट देत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले असून या घटनेमागे कोणाचा हात आहे, कोणाच्या आदेशाने हल्लेखोराने सदरचे कृत्य केले याचा तपास लागण्याची गरज व्यक्त होत आहे. या घटनेने तालुक्याचे राजकीय वातावरण गढूळ झाले असून तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे.
आज (ता.28) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मालपाणी लॉन्सच्या परिसरात सदरचा प्रकार घडला होता. आमदार अमोल खताळ संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून तेथून निघत असताना प्रेक्षकांमधील काहींनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासह हात मिळवण्यासाठी गर्दी केली होती. त्याचवेळी आरोपी प्रसाद बापूसाहेब गुंजाळ याने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ प्रवेश मिळवून अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मात्र आमदारांचे अंगरक्षक सावध असल्याने त्यांनी क्षणात हल्लेखोरावर झडप घालीत त्याला रोखले. हा प्रकार सुरु असतानाच आसपास उभ्या असलेल्या मालपाणी उद्योग समूहाच्या खाजगी सुरक्षारक्षकांनीही तेथे धाव घेत आरोपीला जेरबंद केले.
हा प्रकार प्रेक्षागारातच घडल्याने अनेकजण संतप्त होऊन आरोपीच्या अंगावर धावू लागले. त्यामुळे फेस्टिवलच्या व्यवस्थापनाने सुरक्षारक्षकांच्या गराड्यात आरोपीला त्यांच्या कार्यालयात नेऊन कुलूपबंद केले व या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. मात्र तोपर्यंत सदरची घटना वार्याच्या वेगाने गावात पसरल्याने मोठ्या संख्येने तरुणांची गर्दी होऊ लागली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तेथील जमावाची संख्या हजारात पोहोचल्याने त्यांच्यासमोर आरोपीला कार्यालयाच्या बाहेर काढून पोलीस ठाण्यात घेऊन जाणे धोकादायक ठरु लागले. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटाही मागवला. मात्र या दरम्यान जमावाची उपस्थितीही वाढत गेल्याने या परिसरातील तणावातही प्रचंड वाढ झाली.
अखेर आमदार अमोल खताळ यांनी घटनास्थळी जात जमावाला शांत राहण्याचे आवाहन करीत पोलिसांनाही या प्रकरणामागील सत्य शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने संगमनेर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, या घटनेतील आरोपी मानसिक तणावात असून गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमागे राजकीय कारण आहे किंवा काय याबाबतही तपास होण्याची गरज असून आरोपीला अधिकृत अटक झाल्यानंतर या गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.
Visits: 241 Today: 4 Total: 1106660
