जिद्दीच्या बळावर पोलीस शिपायाचा झाला फौजदार! तेहतीस वर्षांच्या सेवेत ‘कर्तव्यास कसूर’ हा शब्दही गावी नसलेल्या खंडीझोड यांची भरारी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मनात निश्चय पक्का असला की मार्गात येणारे अडथळेही आपोआप बाजूला होतात. मनात असाच ठाम निश्चय घेवून 1989 साली राज्य पोलीस दलात शिपाई म्हणून दाखल झालेल्या संगमनेरच्या विजय खंडीझोड यांचा प्रवासही असाच प्रेरणादायी आहे. पोलीस शिपायापासून सहाय्यक फौजदारापर्यंत पदोन्नतीने उंची गाठणार्‍या या तरुणाने लहानपणीच फौजदार होण्याचं स्वप्नं पाहिलं होतं. असं म्हणतात उघड्या डोळ्यांनी पाहीलेलं स्वप्नं कधीही असत्य ठरत नाही, हे विधान खंडीझोड यांनी वयाच्या 56 व्या वर्षी सत्य ठरविले आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खात्यातंर्गत सरळसेवा परीक्षा देवून ते उत्तीर्ण झाले आणि फौजदार होवून दिमाखात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात हजरही झाले.

सन 1965 साली कोपरगावमध्ये जन्मलेल्या विजय वृंजाजी खंडीझोड यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुन्हा जिल्ह्यात परतले आणि कोपरगावच्या सौमय्या महाविद्यालयातून कनिष्ठ स्तरावरील तर अहमदनगर महाविद्यालयातून वरीष्ठ स्तरावरील शिक्षण घेवून त्यांनी पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला 1986 ते 1988 या कालावधीत त्यांनी मुंबईतील ‘कासा’ या आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक सामाजिक संस्थेत काम केले. त्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सामाजिक वनीकरणाची जबाबदारीही त्यांनी अगदी उत्साहाने आणि समर्थपणे पेलली. त्याच दरम्यान 1987 साली ते संगमनेर तालुक्यातील बाळेश्वरच्या टेकड्यांवर सामाजिक वनीकरणासाठी आले. आज बाळेश्वर मंदिराकडे जाताना लागणारे घनदाट जंगल ही विजय खंडीझोड यांनी 1987 साली संगमनेरच्या पर्यावरणाला दिलेली देणगीच आहे.

संगमनेरसह त्यांनी त्यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना-प्रवरानगर, बारामती अ‍ॅग्रीकल्चर कंपनी, श्रीरामपूर, पुणतांबा, सांगली यासह अहमदनगरचे बुथ हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी सामाजिक वनीकरणातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आणि त्यांचे संवर्धनही केले. या कालावधीत त्यांचे जिल्ह्यासह संगमनेरात वारंवार येणेजाणे असल्याने संगमनेरची परंपरा, संस्कृती, येथील वातावरण या सर्व गोष्टींनी त्यांच्या मनावर गारुडं घातलं आणि ते संगमनेरच्या प्रेमात पडले. या दरम्यान 1989 साली त्यांनी पोलीस भरतीचा मार्ग निवडून आपल्यातील गुणांच्या जोरावर राज्य पोलीस दलात ‘पोलीस कॉन्स्टेबल’ म्हणून प्रवेश केला. विजय खंडीझोड यांना आई-वडिलांकडून चांगले संस्कार मिळाले, समाजाशी प्रेमाने वागावे, अडलेल्यांना मदतीचा हात द्यावा, गोरगरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न करावा ही शिकवणही त्यांना कौटुंबिक संस्कारातून मिळाली. संस्कारांची ही शिदोरी सोबत घेवून ते पोलीस दलात रुजू झाले ते आपलं ‘फौजदार’ होण्याचं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्नं सोबत घेवूनच.

पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती अहमदनगरच्या जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली. नंतरच्या काळात श्रीरामपूर, राहाता, राहुरी, संगमनेर शहर व तालुका अशा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी काम केले. पोलीस दलाचे कामकाज लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस होण्यापेक्षा पोलिसींग राबविण्याचा मनोमन निश्चय केला आणि गुन्हेगार नव्हेतर त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती संपवण्याचा चंग बांधला. तीन वर्षांपूर्वी श्रीरामपूरात कार्यरत असताना त्यांनी एका मोटरसायकल चोराला पकडले होते. त्याच्याकडून सत्तर दुचाक्याही हस्तगत करण्यात आल्या होत्या. चांगल्या घरातील तरुणाने असं कृत्य करणं तपासी अधिकारी असलेल्या खंडीझोड यांना पटलं नाही. त्यांनी वडिलकीच्या नात्यातून त्याचे समुपदेशन केले आणि रामायणात वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसा तो अट्टल दुचाकी चोर आज सद्गृहस्थाचे जीवन जगतोय, अशी कितीतरी उदाहरणे त्यांनी आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून उभी केली आहेत.

पोलीस दलात असूनही खंडीझोड यांनी कधीही कोणत्याही व्यसनाला आपल्या आसपासही फिरकू दिले नाही. ‘आयुष्यात कोणाच्याही डोळ्यात पाणी येवू देवू नकोस’ ही त्यांच्या गुरुंची शिकवण त्यांनी आपल्या जीवनात पदोपदी अंगीकारली. आपण चांगलं करीत राहीलो, तर जे घडतं ते चांगलंच असतं यावर त्यांची धारणा असल्याने त्यांनी आपल्या पोलीस सेवेत अनेकांना मदतीचा हात दिला. वरीष्ठांनी सोपविलेली जबाबदारी पूर्ण करताना तहान-भूक विसरुन ते काम करीत. ‘कर्तव्यात कसूर’ हा शब्द गेल्या तीन दशकांत त्यांनी एकदाही ऐकला नाही. यावरुनच त्यांच्या कामकाजाची प्रचिती येते. उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक अशांच्या हातून त्यांना अनेकदा गौरविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा खंडीझोड यांच्या कामाने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी खंडीझोड यांना सपत्नीक मुख्यालयात बोलावून त्यांचा विशेष सन्मानही केला होता.

अकोले तालुक्यातील पवनचक्क्यांसाठी वापरल्या जाणार्‍या केबल चोरीच्या प्रकरणाच्या वेळी आलेला भयानक अनुभव असो, अथवा औरंगाबाद उच्च न्यायालयातून घराकडे येताना झालेला भीषण अपघात असो अशा अनेक प्रसंगातून केवळ आपण आपल्या कर्माच्या बळावर सहीसलामत बचावल्याचे सांगतांना त्यांचे डोळेही पाणावले होते. पोलिसांचे काम केवळ कायदा व व्यवस्था अबाधित ठेवण्याचेच नसते तर समाजातील गुन्हेगाराचे समूळ उच्चाटन करणे, गैरमार्गावर गेलेल्या तरुणांना पुन्हा सन्मानाने समाजाच्या प्रवाहात आणण्यासारखी कामेही पोलिसांनी करावीत असे अभिप्रेत असते, खंडीझोड यांनी पोलिसांकडून समाजाला असलेली ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अगदी प्रमाणिकपणे प्रयत्न केले. या सर्व प्रवासात ‘संगमनेर’ शहराविषयी त्यांच्या मनात प्रचंड प्रेम असल्याचे सांगतांना त्यांचा ऊरही भरुन येतो. या शहराने मला, माझ्या परिवाराला प्रतिष्ठा दिली, चांगल्या लोकांच्या सहवासातून माझ्या मुलांवरही चांगले संस्कार झाले. येथील नागरिकांनी भरभरुन प्रेम दिले, सन्मान केला आणि संस्कारांचीही उधळण केल्याची कृतज्ञता ते बोलता-बोलता सहज व्यक्त करतात.


आपल्या जीवनात अगदी लहानपणी ठरविलेले ध्येय साधण्यासाठी त्यांनी 2013 साली राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली आणि त्यात ते मोठ्या गुणांनी उत्तीर्णही झाले. सध्या ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असून पोलीस उपनिरीक्षकपदावर नियुक्तीची त्यांना प्रतीक्षा आहे. विजय खंडीझोड यांनी पत्नी सुनीतासह आपली मुले सौरभ आणि विशाल या दोघांवरही उत्तम संस्कार करुन त्यांना उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा सौरभ पुण्यात ग्रीन एनर्जी अंतर्गत एलईडी बल्ब तयार करण्याचा कारखाना चालवतो, तर छोटा मुलगा विशाल पुण्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कार्यरत आहे. सुसंस्कृत असलेल्या संगमनेरातील गीता परिवाराच्या उन्हाळी संस्कार वर्गातून मुलांवर खूप चांगले संस्कार झाले, अ‍ॅड.सदाशिवराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मुले पोहण्यातही तरबेज झालीत, येथील व्याख्यानमालांच्या माध्यमातून कुटुंबात विचारांची बैठक निर्माण झाली असे ते अगदी प्रांजळपणे सांगतात. आमचे मूळगाव कोपरगाव असले तरीही पत्नी आणि मुलांनाही संगमनेरचेच वातावरण भावल्याने आम्ही कायमचे या शहराचे झालो असे सांगतांना त्यांच्या कंठातून कृतज्ञतेचे भावही उमटतात.

संगमनेरपासून पन्नास किलोमीटर अंतरावरील कोपरगावचे रहिवासी असलेल्या विजय खंडीझोड यांचे सगळे मित्र व्यापारी आहेत. उमेदीच्या काळात त्या सर्व मित्रांनी खंडीझोड यांना व्यापार अथवा उद्योग सुरु करण्याचा आग्रह धरला होता. मात्र त्यांनी बालवयातच ‘फौजदार’ होण्याचे ध्येय ठरविल्याने ते आपल्या ध्येयाच्या दिशेनेच मार्गक्रमण करीत राहिले. त्यासाठी त्यांनी पोलीस शिपायापासून आपली कारकीर्द सुरु केली आणि 33 वर्षांच्या पोलीस खात्यातील सेवेनंतर तब्बल वयाच्या 56 व्या वर्षी आपल्या जीवनाचे ध्येय गाठीत पोलीस उपनिरीक्षकवदावर मजल मारली. आपल्या मित्रमंडळींमध्ये ‘बाबू’ नावाने परिचित असलेले खंडीझोड आपल्या मित्रांसह या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ देणार्‍या, शिकवण देणार्‍या प्रत्येकाच्याप्रति आदर व्यक्त करतांना भावनिक होतात.

Visits: 15 Today: 1 Total: 119020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *