वसुंधरा अकॅडेमीत इको फ्रेंडली गणपती प्रशिक्षण

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील अभिनव शिक्षण संस्था संचालित वसुंधरा अकॅडेमीत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपतींची सुंदर निर्मिती करून एक वेगळा संदेश दिला. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या इको फ्रेंडली गणपती स्पर्धांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि शाडू मातीचा वापर करून बाप्पांची आकर्षक मूर्ती बनवल्या. वसुंधरा अकॅडेमीचे कला शिक्षक शिवराज तिटमे यांनी विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.

या उपक्रमामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे हा होता. प्लास्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषण होते, हे लक्षात घेता शाळेने विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यांचा वापर करण्याचे प्रोत्साहन दिले. प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी तयार केलेले गणपती केवळ कलात्मकच नव्हते, तर प्रत्येक मूर्ती मागे एक सामाजिक किंवा पर्यावरणीय संदेश देखील होता.
कुणी जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर कुणी झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश दिला.संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, सचिव विक्रम नवले, कोषाध्यक्ष डॉ. जयश्री देशमुख, सहसचिव प्राचार्या अल्फोन्सा डी., सर्व पदाधिकारी, सर्व विभागांचे प्राचार्य व सर्व पालकांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाबाबतची जबाबदारी या सर्व गोष्टींचा समतोल साधला गेला.
Visits: 203 Today: 2 Total: 1110479
