अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास दहा वर्षाची शिक्षा संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्याच नात्यातील एका अल्प वयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम छगन मच्छिंद्र खेमनर यास संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी तब्बल सात वर्षानंतर 10 वर्ष सश्रम कारावास व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांभूळवाडी येथील गुन्हेगार छगन मच्छिंद्र खेमनर याने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीशी जवळीक केली. एकेदिवशी त्याच्या शेतात मजुरीसाठी तिला पाठवा असे तिच्या आईवडीलांना सांगितले आणि नात्यातलाच मुलगा असल्यामुळे आईवडीलांनी त्याच्याबरोबर तिला पाठवले. त्यानंतर खेमनर याने तिला शेतात कामासाठी न नेता थेट एका जंगलात नेले. तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जर ही घटना कोणाला सांगितली तर तुला जीवे ठार मारीन अशी धमकीही त्याने दिली. त्यानंतर तिला मोटरसायकलवरून तिच्या घरी नेऊन सोडले.

घरी गेल्यानंतर पीडितेने रडतरडत संपूर्ण आपबिती आपल्या आईवडीलांना सांगितली. त्यानंतर तिने आईवडीलांसोबत थेट घारगाव पोलीस ठाणे गाठत छगन खेमनर याच्या विरोधात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी छगन मच्छिंद्र खेमनर याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करत दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा खटला तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर सुरू होता. तब्बल सात वर्षानंतर संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर सुनावणी होवून एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली आणि सरकारी पक्षाचे वकील संजय वाकचौरे जोरदार युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी छगन मच्छिंद्र खेमनर यास 10 वर्ष सश्रम कारावास आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विजय परदेशी, पोहेकॉ. प्रवीण डावरे, महिला पोकॉ. दीपाली दवंगे, प्रतिभा थोरात, पोकॉ. विक्रांत देशमुख, महिला पोकॉ. स्वाती नाईकवाडी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
