अकोले तालुक्यातील चौघा दिग्गजांची विखेंच्या वाहनात गुफ्तगू! राजकीय तर्क-विर्तकांना ऊत; अकोल्यात राजकीय उलथापालथ होणार?..


नायक वृत्तसेवा, अकोले
कधीकाळी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अत्यंत विश्वासू वलयातील समजल्या जाणार्‍या तिघांसह अकोले तालुक्यातील चौघा दिग्गज नेत्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चक्क चालत्या वाहनात ‘गुफ्तगू’ केल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यातील राजकीय तर्क-विर्तकांना ऊत आला आहे. या चौघांची ‘ती’ भेट अकोल्यातील बदलत्या राजकारणाचे चित्र आहे की अन्य काही याबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरीही त्यातून वेगवेगळ्या राजकीय कड्या जोडल्या जावू लागल्या आहेत. मंत्री विखेंची भेट घेणार्‍यांमध्ये माजी मंत्री पिचडांच्या नेहमीच विरोधात असलेल्या नेत्याचाही समावेश असल्याने या भेटीमागील गुढ मात्र अनेकांच्या झोपा उडवणारे ठरले आहे.

आदिवासी बहुल असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघाने 2019 सालच्या निवडणुकीत परिवर्तन घडवताना राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या आमदार वैभव पिचड यांना पराभवाची धूळ चारली. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भरगच्च सभा झाल्या. यावेळी एका सभेत माजी उपमुख्यमंत्र्यांनी अकोल्यातील बहुजनांचे नेते मानल्या जाणार्‍या सीताराम गायकर यांच्यावर अतिशय शेलक्या भाषेत टीका करताना त्यांचे धोतर फेडण्याचेही भाष्य केले होते. त्यातून पवार आणि गायकरांचे परस्पर संबंध ताणले गेल्याचे बोलले जात असतानाच खुद्द अजित पवार यांच्याच शिष्टाईने पिचडांसोबत भाजपवासी झालेल्या गायकरांसह कैलास वाकचौरे यांनीही हातात घड्याळ बांधले.

चार दशके अकोल्याचे सत्ताकेंद्र असलेल्या पिचड पिता-पुत्रांची सत्ता खालसा झाल्यानंतर राष्ट्रवादीने राज्यातील सत्तेचा वापर करुन आपल्या पक्षाची पाळेमुळे रुजवण्यासाठी अकोल्यात मोठी शर्थ केल्याचेही नंतरच्या काळात दिसून आले. त्यातूनच पिचड विरोधकांची मोट बांधून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगस्ति कारखान्याची सत्ताही ताब्यात घेतल्याने अकोल्यात एकप्रकारे राजकीय वादळ उठले. अकोल्यात राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची मोठी ताकद असल्याचे समजले जाते. आजवरच्या निवडणुकांतील मतदानाची आकडेवारी पाहता ही गोष्ट अधिक स्पष्टपणे समोरही येते. मात्र अकोल्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि गेली वर्षोनुवर्ष एकाच गटाच्या ताब्यात असलेला पक्ष यामुळे जिंकण्याची क्षमता असतानाही शिवसेनेला अकोल्यात फार मोठे काही करता आले नाही.

त्यातच सहा महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप होवून त्यातून शिवसेनेत उभी फूट पडल्याने या पक्षाची ताकद विभागली गेली आहे. त्यातही पदाधिकार्‍यांचे खांदेपालट करताना पक्षाने गेल्या दीड दशकांपासून ज्यांच्या हातात सूत्रे होती त्यांच्याच घरात पदांची खिरापत वाटल्याने गेली वर्षोनुवर्ष पक्षासाठी राबणार्‍या अनेकांच्या मनात सल निर्माण झाली. त्यातून आदिवासी ठाकर समाजातून पुढे आलेले व यापूर्वी पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले मारुती मेंगाळ यांनाही आपल्या राजकीय भवितव्याबाबत चिंता वाटू लागली. या संधीचा फायदा घेत विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय खेळी करताना मारुती मेंगाळांना गळाला लावण्याचा प्रयोग केला.


अर्थात मारुती मेंगाळ राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा अकोल्यात सुरु असली तरीही अद्याप खुद्द मेंगाळ यांनी मात्र त्यावर कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. मात्र त्यांच्या सोडचिठ्ठीच्या चर्चांनी आधीच फुटीचा सामना करणार्‍या शिवसेनेत मात्र खळबळ उडाली असून पक्षातील अंतर्गत गटबाजीही वेळोवेळी उफाळून आली आहे. एकीकडे राष्ट्रवादीशी लढण्याची ताकद असलेल्या शिवसेनेत अंतर्गत कलहाने वातावरण दूषित झालेले असताना आता त्या पक्षातील जनमानसात ‘प्रतिमा’ असलेले नेते पळविण्याची योजना रंगात येत असतांनाच आता तालुक्याच्या पूर्वेकडून राष्ट्रवादीलाच हादरा देण्याची योजना आखली जात असल्याची चिन्हे दिसत आहेत.

तसं दाखवणारी एक घटनाही समोर आली असून गेल्या पंधरवड्यात 17 डिसेंबर रोजी अकोले तालुक्यातील चार-चार दिग्गज नेत्यांनी तब्बल 50 किलोमीटरचे अंतर कापताना लोणी गाठली. एरव्ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लोणीत असल्यावर त्यांना भेटण्यासाठी येणार्‍यांची दिवसभर वर्दळ असते. त्याप्रमाणे ‘त्या’ दिवशीही लोणीतील त्यांच्या कार्यालयात सामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती. अशा गर्दीत अकोल्यातील ‘राष्ट्रवादी’चे दिग्गज नेते दृष्टीस पडल्यास काही क्षणात जिल्हा ढवळून निघाला असता. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मंत्री विखे यांनी ‘त्या’ चौघांनाही लोणीच्या बैल बाजाराजवळ थांबण्यास सांगितले. काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर मंत्री विखे आपल्या वाहनासह तेथे पोहोचले आणि आसपासच्या नागरिकांना काही समजण्यापूर्वीच त्यांचा ताफा शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला.

याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता शनिवार 17 डिसेंबर रोजी शिर्डीतील शिक्षण संकुलाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार होते. अकोल्यातील राजकीय मंडळींना घेवून ते तेथेच पोहोचले. उद्घाटन सोहळा आटोपताच पुन्हा चौघेही मंत्री महोदयांच्या वाहनात बसले आणि तेथून त्यांनी पुन्हा लोणी गाठली. यावेळी मात्र त्या सर्वांसह मंत्री महोदयांचे वाहन थेट शिर्डीतील एका खासगी ठिकाणी आले व मंत्र्यांसोबतच उपस्थितांना ‘त्या’ चारही चेहर्‍यांचे दर्शन घडले. त्यात अकोल्यातील बहुजनांचे दिग्गज नेते मानले जाणारे सीताराम गायकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे, कैलास वाकचौरे व काँग्रेसचे नेते मीनानाथ पांडे या चौघांचा समावेश होता.

त्या खासगी ठिकाणावर पोहोचल्यानंतर मंत्री विखेंसोबत त्या चौघांचीही बंद दाराआड पुन्हा एकदा गुफ्तगू झाली आणि सुमारे तासाभरानंतर त्या चौघांनीही परतीचा प्रवास सुरु केला. जवळपास दोन ते अडीच तासांच्या कालावधीत सुरुवातीला प्रवासात आणि नंतर बंद खोलीत अकोल्यातील या चौघांनी मंत्री विखे पाटील यांच्याशी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली याबाबत मात्र कोणताही तपशील उपलब्ध होवू शकलेला नाही. यामागे आगामी कालावधीत होणार्‍या अमृतसागर दुध संघाच्या निवडणुकीचीही चर्चा जोडली आहे. मात्र वास्तव कारणांचा अद्याप खुलासा झाला नसल्याने या चौघांचीही भेट अकोल्यात राजकीय उलथापालथ करणारी तर नाही ना? अशी मात्र शंका निर्माण करणारी ठरली आहे.


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या खास मर्जीतील नेते अशी ओळख असलेल्या मधुकर पिचड यांच्या पक्षत्यागापासूनच राष्ट्रवादीने त्यांची पोकळी भरुन काढण्यासह अकोल्याची सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी शर्थ केली आहे. त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचलेल्या मारुती मेंगाळसारख्या तरुण नेत्यालाही गळाला लावले जात आहे. मात्र दुसरीकडे ज्यांच्या भरवशावर पक्षाकडून हे सगळे प्रयोग सुरु आहेत तेच लोणीच्या वळचणीला दिसून आल्याने अकोल्यातील राजकीय वुर्तळात तर्क-वितर्कांना ऊत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *