संगमनेर शहरात गोकुळाष्टमीचा जल्लोष! ‘आय लव संगमनेर’च्या दहीहंडी व सांस्कृतिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
विधान परिषदेचे युवा आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेरात गोकुळाष्टमी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली तसेच  कृष्ण राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करून बालगोपाल गोकुळांचा उत्साह वाढवण्यात आला.
संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेच्या माध्यमातून गोकुळाष्टमी निमित्त  दहीहंडी उत्सव व वेशभूषा स्पर्धा  उत्साहात पार पडल्या. शनिवार दि.१६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत  शहरातील तब्बल २२ ठिकाणी एकाचवेळी दहीहंडी सोहळा तसेच राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
या उपक्रमात बालकांनी कृष्ण-राधा वेशभूषेत सुंदर सादरीकरण केले तर युवकांनी थरारक दहीहंडी फोडून उत्सवाला रंगत आणली.यात  शहरातील देवी गल्ली मित्र मंडळ, ज्ञानेश्वर गल्ली मित्र मंडळ, रेणुका उत्सव मित्र मंडळ साळीवाडा,  महाराणा प्रताप युवक मंडळ चव्हाणपुरा, इंदिरानगर युवा प्रतिष्ठान, भीम गर्जना मित्र मंडळ, नवख्या गणपती मित्र मंडळ  यांसह अनेक प्रमुख मंडळांचा सहभाग होता.उत्सवात बालकांसाठी शालेय शिक्षणोपयोगी भेटवस्तू, महिला भगिनींसाठी विशेष बक्षिसे तर दहीहंडी विजेत्या मंडळांसाठी श्रीकृष्ण मूर्ती व आकर्षक पारितोषिके देण्यात आली.यावेळी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने संगमनेर शहरात भक्तिभाव आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
संगमनेरच्या युवकांमध्ये अमाप ऊर्जाशक्ती आहे. त्यांना नेहमीच आपले कौशल्य दाखवण्यासाठी व समाजकार्यात सहभागी होण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे. याच भावनेने संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत असणारी ‘आय लव्ह संगमनेर’ ही संस्था शहरातील युवक, महिला व बालकांना एकत्र आणून सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीतून  समाजबंधन अधिक मजबूत करत असल्याचे आ.सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले.
Visits: 184 Today: 13 Total: 1584221

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *