गुन्हेगारीने शिर्डीकरांची वाढली चिंता! पोलिसांनी कडक पावले उचलण्याची नागरिकांतून मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईनगरीत गंठणचोरी, रोडरोमिओंचा सुळसुळाट, पाकिटमारी, अवैध दारूविक्री, मटका जुगार, चाकूहल्ला तसेच खुनाच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. ही वाढती गुन्हेगारी शिर्डीकरांसाठी चिंतेची बाब ठरत असून पोलिसांनी वेळीच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पाकिटमार टोळ्या, महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनसाखळी चोरीचे वाढते प्रमाण, दुचाकी वाहनांची चोरी, चाकूहल्ला, खून अशा प्रकारचे विविध गुन्हेे शिर्डी पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. उपनगरात हॉटेल, लॉजिंगचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे साई समाधीचे दर्शन झाल्यावर महिला भाविक शिर्डीतील रस्त्यावरून संध्याकाळी, रात्री आरती झाल्यानंतर हॉटेलच्या निवासस्थानी पायी जातात. याच संधीचा फायदा घेत सोनसाखळी चोर नजर ठेवून भरगाव वेगाने दुचाकीवर पाठलाग करत अगदी काही क्षणात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी आणि किमती सोन्याचे दागिने लुटून नेण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांपुढे आहे. मात्र हॉटेल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलीस तपासाला अडचणी येतात ही बाब पुढे आली आहे. तर प्रत्येक उपनगरात भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी बहुभाषिक पोलीस हेल्पलाईनचे मोठे फलक लावले तर भाविकांना तक्रार देण्यास मदत होईल.
साईनगरीत मोठ्या प्रमाणात हॉटेल व लॉजिंग असल्यामुळे परराज्यातील गुन्हेगार शिर्डीत येऊन आश्रय घेतात. तसेच मद्य प्राशन करून महिलांच्या, विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी सरकारने पोलिसांच्या दामिनी पथकाची स्थापना केली आहे. मात्र हे पथक बंद असल्याने अशा चोरीच्या घटनांत वाढ होताना लक्षात येते. शिर्डीमध्ये साईसंस्थानच्या कॉलेजकडे अनेक रोडरोमिओंचा दुचाकीवर स्टंट आणि त्यामाध्यमातून विद्यार्थी तरुणींनींना होणारा त्रास, छेडछाड याचेही प्रमाण वाढले आहे. याची तक्रार अनेक तरुणींनी पालकांकडे केली असून सध्या सर्वजण चिंतेत आहे. यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलून साईनगर भयमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.