शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणेच जमिनींचा मोबदला मिळेल ः तनपुरे सूरत-हैदराबाद महामार्गात जमिनी जाणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा

नायक वृत्तसेवा, राहुरी
सूरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी लवकरच भूमी अधिग्रहण प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते, त्यासाठी राज्य शासनाचा भूमी अधिग्रहणाचा 6 ऑक्टोबर, 2021 रोजीचा नवीन शासन निर्णय लागू नसेल. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार मूल्यांकन होईल. महामार्गासाठी जमिनी जाणार्‍या शेतकर्‍यांनी चिंता करू नये. त्यांना पूर्वीच्या मूल्यांकनानुसार मोबदल्याची रक्कम मिळेल, असे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मंगळवारी (ता.19) सायंकाळी मुंबई येथून ऑनलाईन पत्रकार परिषदेत मंत्री तनपुरे बोलत होते. ते म्हणाले, सूरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून 110 किलोमीटर जात आहे. त्यात, राहुरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. त्यामुळे, महामार्गासाठी भूमी अधिग्रहित होणार्‍या शेतकर्यांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

राज्य शासनाच्या 6 ऑक्टोबर रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार भूमी अधिग्रहण मोबदला रकमेची परिगणना करताना गुणन घटक 1.0 राहतील. असा उल्लेख आहे. पूर्वी तो 2.0 होता. त्यामुळे, शेतकर्‍यांची बेचैनी वाढली. मोबदल्याची निम्मी रक्कमच मिळेल. असा समज शेतकर्‍यांमध्ये पसरला. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्याविषयी मुंबई येथे मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार 6 ऑक्टोबरचा शासन निर्णय नवीन महामार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी लागू होत नाही. नवीन शासन निर्णयाची अधिसूचना जुन्या महामार्गालगत असलेल्या कृषक व कृषक जमिनींच्या अधिग्रहणासाठी आहे. त्यामुळे पूर्वीच्या अधिनियमानुसार गुणन घटक 2.0 नुसार मूल्यांकन करुन, मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे, संदिग्ध शेतकर्‍यांनी चिंता करू नये, असे आवाहन राज्यमंत्री तनपुरे यांनी केले आहे.

शेतकर्‍यांसाठी तनपुरे-विखे एकत्र..
अस्तित्वातील महामार्गालगत जमिनी अधिग्रहीत करतांना अकृषक जमिनींसाठी जास्त पैसे मोजावे लागतात., अशी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची धारणा आहे. तसे त्यांनी जाहीररित्या बोलून दाखविले आहे. महाराष्ट्रातील जुन्या महामार्गांची कामे मार्गी लागावीत. यासाठी राज्य शासनाने 6 ऑक्टोबरचा नवीन शासन निर्णय काढला आहे. माझा व खासदार डॉ. सुजय विखे यांचा पक्ष वेगळा असला तरी, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आम्ही दोघेही एकत्र आहोत असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

Visits: 121 Today: 2 Total: 1110828

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *