‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मदतगारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न! पठारभागात रचले जात आहे षडयंत्र; ‘त्या’ गावच्या ग्रामस्थांकडून पोलिसांना निवेदन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीन महिन्यांपूर्वी तालुक्यात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी पठारभागातील गांजातस्कर युसुफ चौगुले याच्यासह तिघांना अटक केली होती तर, तिघे अद्यापही फरार आहेत. यातील अटकेत असलेल्या आरोपीला जामीन सोयीस्कर व्हावा आणि पसार आरोपींचा शोध थांबावा या हेतूने पठारभागातील काहीजण एका महिलेला पुढे करुन सदरचे षडयंत्र राबवित असल्याचा गंभीर आरोप करीत हा प्रकार घडलेल्या ‘त्या’ गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून गावाशी कोणताही संबंध नसलेल्या ‘त्या’ महिले विरोधात घारगाव पोलिसांना सविस्तर निवेदन देवून या प्रकरणात दखल देण्याची मागणी करण्यात आली आहे.


तीन महिन्यांपूर्वी 7 जुलैरोजी पठारभागातील एका गावात राहणार्‍या 19 वर्षीय तरुणीला मंचर येथे बोलावून पठारभागातील कुख्यात गांजातस्कर, शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचा तत्कालीन पदाधिकारी युसुफ दादा चौगुले याने स्वतःच्या कारमधून शादाब तांबोळी याच्याकरवी तिचे अपहरण करुन मुंबईला नेले होते. पीडित तरुणीला शादाब तांबोळीसह तीन दिवस मुंबईत ठेवल्यानंतर 10 जुलैरोजी दोघेही घारगाव पोलिसांसमोर हजर झाले होते. तत्पूर्वी या घटनेनंतर पठारावरील ‘त्या’ गावातील नागरिकांसह संगमनेरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घारगावात मोठे आंदोलन उभे करुन या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केल्याने पोलिसांवर दबाव निर्माण झाला, त्यातूनच दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर होण्यास भाग पाडण्यात आले होते.


तीन दिवसांच्या कालावधीत शादाब तांबोळी याने पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यासह बळजबरीने तिचे धर्मांतर करुन तिच्याशी निकाह केला. यासाठी मुंबईतील आदील शेख व आयाज पठाण या दोघांनी त्याला मदत केली. या प्रकरणी पीडित तरुणीने 26 जुलैरोजी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड युसुफ दादा चौगुले याच्या श्रीरामपूरात जावून मुसक्या आवळल्या. त्यानंतर आठ दिवसांनी मुंबईतील आदिल शेख याच्यासह साकूरमधील अमर पटेल यालाही गजाआड करण्यात आले होते. कालांतराने अटकेत असलेल्या तिघांनीही संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले. त्यावरील सविस्तर सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांचे जामीन मंजूर करताना मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले याचा जामीनअर्ज मात्र फेटाळला.

या दरम्यान पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह थेट ओडिशातही छापे घालून फरार असलेल्या शादाब तांबोळीसह त्याला मदत करणार्‍या कुणाल शिरोळे व आयाज पठाण यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, आजही पोलीस या तिघांच्याही हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आरोपींच्या येथील कुटुंबालाही परागंदा व्हावे लागल्याने त्यांच्या मदतीसाठी आता काहीजण पुढे सरसावले असून धर्मांतर करण्यासह या प्रकरणात सगळी मदत करणार्‍या युयुफ चौगुले याचा जामीन मंजूर व्हावा यासाठी पीडितेच्या गावाशी कोणताही संबंध नसलेल्या व ‘लव्ह जिहाद’मधून मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या एका महिलेचा वापर करुन पीडितेला मदत करणार्‍या स्थानिकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात षडयंत्र राबवले जात आहे.


गेल्याकाही दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराने ‘त्या’ गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आज सकाळी मोठ्या संख्येने घारगाव पोलीस ठाण्यात येवून पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांची भेट घेत त्यांना सध्या सुरु असलेल्या संपूर्ण षडयंत्राची माहिती दिली. त्यासोबतच या संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकणारे निवेदनही देण्यात आले आहे. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी पठारभागात घडलेल्या या घटनेनंतर अटकेत असलेल्या युसुफ चौगुले याच्यासह फरार असलेल्या आरोपींचे नातेवाईक जाणूनबुजून गावातील काही व्यक्तिंची बदनामी करीत असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड, गांजातस्कर युसुफ चौगुले याला ‘भाऊ’ मानणारी एक महिला ‘त्या’ गावात येवून मुक्कामी राहिली असून लव्ह जिहाद प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला मदत करणार्‍या गावातील निवडक व्यक्तिंवर विनयभंगासारखे आरोप करीत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहे.


या प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या युसुफ चौगुलेला जामीन मिळत नसल्याने व स्थानिकांसह हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून फरार आरोपींच्या अटकेसाठी सातत्याने दबाव वाढत असल्याने त्यातून आरोपींची सुटका व्हावी यासाठीच हा प्रकार घडवला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सदरची महिला ‘त्या’ गावाशी संबंधित नसतांनाही तिच्याकडून जाणूनबुजून आरोपींच्या नातेवाईकांकडून सांगितल्यानुसार गावातील काही लोकांना त्रास दिला जात असून त्यातून गावातील सामाजिक सौहार्दाला बाधा निर्माण होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सदरची महिला स्वतःहून काही लोकांना फोन करीत असून त्याद्वारे फसवण्याचा आणि धमक्या देण्याचा प्रकार सुरु आहे. त्यातील काही फोन कॉल रेकॉर्डही करण्यात आले असून पेनड्राईव्हमध्ये त्याचे संभाषणही पोलिसांना देण्यात आले आहे. त्यावर घारगाव पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


घारगाव परिसरातील ‘त्या’ गावात लव्ह जिहादची घटना घडल्यानंतर 1 ऑगस्टरोजी ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यात विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात येवून त्यावर एकमुखाने निर्णय घेण्यात आले होते. त्याचवेळी अन्य गावातून ‘त्या’ गावात राहण्यासाठी येणार्‍यांसाठीही विविध नियम करण्यात येवून जागामालकाचे करारपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड यासारख्या गोष्टींची पूर्तता न करणार्‍यांना गावात राहु देवू नये असाही ठराव करण्यात आला होता. आज तेथील ग्रामस्थांनी निवेदनासह कॉल रेकॉर्डिंग आणि ठरावाची प्रतही घारगाव पोलिसांना दिली आहे.

Visits: 29 Today: 1 Total: 79270

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *