नेचर अर्थ रिसॉर्टचे विजय थोरात यांचा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने गौरव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हॉटेल क्षेत्रात अल्पावधीत नावाजलेले तालुक्यातील वडगाव पान येथील नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक विजय थोरात यांना मंगळवारी पुणे येथे ‘स्विफ्ट न लिफ्ट’ या संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५’ ने गौरवण्यात आले. प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व येवले अमृततुल्यचे संस्थापक नवनाथ येवले यांच्या हस्ते विजय थोरात यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे येथील स्विफ्ट न लिफ्ट या संस्थेच्या वतीने देशातील व राज्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांना उद्योजकता पुरस्कार देण्यात येतो. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगतशील व्यावसायिकांना २०२५ या वर्षातील पुरस्कार देण्यात आला. यामध्ये हॉटेल व्यवसायात नावाजलेले तालुक्यातील वडगाव पान येथील नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक विजय थोरात यांचा समावेश होता. थोरात यांनी अत्यंत अल्पावधीत आपल्या हॉटेलचा व्यवसाय प्रगतीपथावर नेऊन ठेवला. अत्यंत गरीब कुटुंबातून विजय थोरात हे मोठे झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात नोकरी केली. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर होता. याच काळामध्ये त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. हॉटेल व्यवसायाचा कोणताच अनुभव नाही आणि या व्यवसायासाठी लागणारा मुबलक पैसा देखील त्यांच्याकडे नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही. व्यवसायात प्रगती करून दाखवण्याची धडपड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी सर्व अडचणींवर मात करत सन २०१८ मध्ये वडगाव पान याठिकाणी नेचर अर्थ रिसॉर्ट नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला. आपल्या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकाला काहीतरी वेगळे दिले पाहिजे, यासाठी त्यांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारासह आजूबाजूला विविध प्रकारची झाडे लावली. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला याठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटायचे. त्याचबरोबर ग्राहकाला उत्तम जेवण व जलद सेवा यावर देखील त्यांनी आवर्जून लक्ष दिले आणि कमी कालावधीतच ग्राहकांचे मन जिंकण्यात नेचर अर्थ हे यशस्वी झाले. मागील सात वर्षात विजय थोरात यांनी संगमनेरसह श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, अकोले, लोणी येथील ग्राहकांना देखील नेचर अर्थ रिसॉर्ट कडे आकर्षित केले असून हे सर्व भेट देण्यासाठी याठिकाणी येत असतात. तसेच अनेक मान्यवर व मोठ मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींनी देखील या हॉटेलला भेट देवून कौतुक केले आहे. या सर्व कामाची पुणे येथील स्विफ्ट न लिफ्ट या संस्थेने दखल घेत नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक विजय थोरात यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ देण्याचे जाहीर केला. या पुरस्काराचा वितरण सोहळा पुणे येथे पार पडला. विजय थोरात यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विजय थोरात यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे,आ.अमोल खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल अमोल कासार, अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. सागर गोपाळे, सागर हासे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांसह मित्र परिवार व वडगाव पान ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

मी गेल्या सात वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहे. ग्राहकांची पसंती हेच माझे समाधान आहे. या हेतूनेच नेचर अर्थ रिसॉर्टची निर्मिती झाली. आज मला महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ मिळाल्याने आणखी काम करण्याची एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे. हे सर्व माझ्या कुटुंबांमुळे व हॉटेल मधील सर्व कर्मचारी यांच्यामुळे शक्य झाले आहे. यापुढे नेचर अर्थ रिसॉर्टचे नाव अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे विजय थोरात यांनी सांगितले.

Visits: 97 Today: 1 Total: 1108887
