‘शिर्डी ग्रामस्थ विरुद्ध तृप्ती देसाई’ नव्या वादाच्या अंकाला सुरुवात होण्याची शक्यता पोषाख फलकाचा वाद; तर साई संस्थानचा तृप्ती देसाईंच्या आंदोलनाबाबत बोलण्यास नकार
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबा संस्थानच्या संस्कृतीप्रधान पोषाखाबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संस्थानने त्वरीत फलक हटविण्याची मागणी केली असून, तो हटवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता शिर्डी ग्रामस्थ विरुद्ध तृप्ती देसाई या नव्या वादाच्या अंकाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे साई संस्थानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून आम्ही आवाहन केलं असून सक्ती नाही यावर ते ठाम आहेत.
साई मंदिरात दर्शनाला येताना भारतीय पोशाखात यावं अथवा सबाह्य कपडे घालावे असे आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात दोन दिवसांपूर्वी लावले आहेत. हा निर्णय खूप पूर्वीचा असला तरी केवळ फलक लावल्याने आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तथा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिर्डीत ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून भविष्यात तृप्ती देसाई यांनी असे काही केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे संस्थानच्या या निर्णयाचा ज्या साई भक्तांवर याचा परिणाम होणार आहे, त्यांनी मात्र आपल्या प्रतिक्रिया देताना काहींनी स्वागत केलं आहे. तर काहींनी हा निर्णय चुकीचा वाटतो. मात्र अशा आवाहनामुळे राजकारण करु नये अशीही भावना भक्तांनी बोलून दाखवली आहे.
एकीकडे फलकावरून वाद सुरू असताना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साई दर्शन घेतले असून, हा निर्णय सक्तीचा नसून आवाहन असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी भक्तांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं आवाहन करत एक प्रकारे समर्थनचं केलं आहे. याबाबत साई संस्थानच्यावतीने पहिल्या दिवसापासून ही सक्ती नसून आवाहन असल्याचे सांगितलं असून भाविकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर असे आवाहनचे फलक लावले असल्याचे स्प्ष्ट केले आहे. मात्र तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाबाबत काही बोलण्यास साई संस्थानने नकार दिला आहे.