साकुरला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करा!  अमृता कोळपकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन 

नायक वृत्तसेवा, संगमनेर
साकुर पठार भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी आणि तेथे पोलीस कर्मचाऱ्यांसह उपनिरीक्षक पदाचा अधिकारी नेमावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वक्ता सेलच्या राज्य उपाध्यक्षा अमृता अनिल कोळपकर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पालकमंत्री विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात अमृता कोळपकर यांनी म्हटले आहे की,  ४८ गावे सध्या घारगाव पोलीस ठाण्याला जोडलेली आहेत. घारगाव, बोटा, अकलापूर, साकुर अशी मोठी गावे या पोलीस ठाण्या अंतर्गत येत असल्याने उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो आहे. परिणामी या भागातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. एकट्या साकुरची लोकसंख्या १४ हजाराच्या आसपास आहे. येथे मोठी बाजारपेठ असून अनेकदा येथे चोरी बरोबरच इतर घटना घडत असतात. सध्या येथे पोलीस चौकी आहे मात्र तेथे कधीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसतात.
त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून या ठिकाणी साकुरच्या आसपास असणारी काही गावे जोडून स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करून पोलीस कर्मचाऱ्यांसह उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी अमृता कोळपकर यांनी केली आहे. त्याचबरोबर संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या टेकडवाडी केटीवेअर वरून जांबुत आणि परिसरातील छोटे मोठे विद्यार्थी, अनेक माल गाड्या, विविध प्रकारची वाहने जात येत असतात मात्र या केटीवेअरला संरक्षक कठडे नसल्याने येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे आपण लक्ष देऊन या केटीवेअरचे रुंदीकरण करून संरक्षक कठडे बसवण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात अशी मागणीही अमृता अनिल कोळपकर यांनी केली आहे. यावेळी गुलाब भोसले, बुवाजी खेमनर, बाळासाहेब कोंडाजी खेमनर, रौफ शेख, अमित धुळगंड आदी उपस्थित होते.
Visits: 94 Today: 1 Total: 1110393

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *