72 तासांत 52 बालकांवर यशस्वी हृदय उपचार ‘एसएमबीटी हॉस्पिटल’ सर्वसामान्यांसाठी ठरतेय वरदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलकडून आयोजित करण्यात आलेल्या हृदयविकार शस्रक्रिया आणि उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक बालकांवर उपचार करण्यात आले. 72 तासांत तब्बल 52 बालकांवर मोफत यशस्वी हृदय उपचार झाले. शिरपूर, साक्री व मालेगाव परिसरातील सर्वाधिक बालकांचा यात समावेश होता.

विशेष म्हणजे, पहिल्यांदाच शिरपूरहून धुळे आणि धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल कॉरिडोर साकारण्यात आला. याद्वारे तत्काळ खासगी वाहनातून 62 बालकांसह नातेवाईकांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान, रुग्णांसह नातलगांची सर्वच काळजी हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात आली. एसएमबीटी हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे व नंदुरबार नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. दर महिन्याला हॉस्पिटलकडून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते. यादरम्यान, यादरम्यान बालकांसाठी मोफत तर प्रौढांसाठी अल्प दरात तपासण्या केल्या जातात. गेल्या महिन्यात शिरपूरसह परिसरात हृदय तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. एकाच दिवशी विक्रमी अडीचशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी याप्रसंगी करण्यात आली. सकाळपासून सुरु झालेले आरोग्य शिबिर रात्री उशिरापर्यंत सुरु होते. आत्तापर्यंत याठिकाणी झालेल्या शिबिरातील सर्वात मोठे आणि उत्तम नियोजन असलेले शिबिर असल्याची भावना धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमच्या पथकाने व्यक्त केली. तसेच आरबीएसकेच्या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटल आयोजित शिबिरात अनेक बालकांना मोफत उपचारार्थ दाखल देखील करून घेण्यात आले.

ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये 248 बालकांच्या पालकांनी नोंदणी केली होती. त्यातील 163 रुग्णांनी शिबिरात तपासणी करण्यात आली. यातील 65 बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी स्थानिक उद्योगपती आणि आमदार अमरीश पटेल यांच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलने (आयजीएम हॉस्पिटल) सहकार्य केले. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट (हृदय विकार कक्ष) हा स्वतंत्र विभाग रुग्णसेवेसाठी वर्षातील 365 दिवसही सुरू असतो. या विभागात गत सात वर्षात हृदय विकारांवरील 18 हजार पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. नागरिकांनी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारावी, हा मुळ हेतू एसएमबीटी हॉस्पिटलचा आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू असताना स्थापनेपासून ते आतापर्यंत रुग्णांना अद्यावत, दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात हॉस्पिटल प्रशासन यशस्वी ठरले आहे.

आम्ही मूळ जळगावचे. सध्या भिवंडीला राहतो. आमच्या मुलीवर हृदय उपचार करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तेव्हा मोठे टेन्शन आले होते. यानंतर आम्हांला फेसबुकवर एसएमबीटीचा संपर्क क्रमांक मिळाला. इथे संपर्क केल्यानंतर त्यांनी योग्य मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे भिवंडी ते एसएमबीटी हा प्रवास सोप्पा झाला. यशस्वी उपचारानंतर माझ्या मुलीला नवा जन्मच एसएमबीटीने दिला आहे.

– संतोष सोनवणे (यज्ञाचे वडील, भिवंडी, जि. ठाणे)

माझ्या भावाच्या मुलाला हृदयाचा त्रास होता. अनेक डॉक्टरांकडे तपासणीला उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी मोठा खर्च या ऑपरेशनसाठी येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दर महिन्यात शिबिर असल्याचे समजले. यानंतर हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि ऑपरेशन झाले. माझ्या पुतण्याच्या चेहर्‍यावरील आनंद, समाधान पाहून आज आनंद होत आहे. हॉस्पिटलमधील जेवण दर्जेदार आणि स्वच्छताही तितकीच नीटनेटकी आहे.
– रवींद्र पावरा (सत्यमचे काका, शिरपूर, जि. धुळे)

Visits: 14 Today: 1 Total: 115927

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *