रात्रीच्या संचारबंदीला व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! वेळेपूर्वीच दुकाने बंद होत असल्याने आठ वाजताच पडतात गर्दीचे रस्तेही ओस..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला जिल्ह्यासह संगमनेर शहरातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. व्यापारी स्वयंस्फूर्तीने वेळेआधीच दुकाने बंद करीत आहेत, तर नागरिकांमध्येही ‘आठच्या आत घरात’ जाण्याची लगबग पहायला मिळत असल्याने वेळेपूर्वीच शहरातील रस्ते ओस पडत आहेत. पोलीस, महसुल व पालिका प्रशासन संचारबंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी रात्री आठनंतर रस्त्यावर उतरत आहेत. मात्र आत्तापर्यंत यंत्रणेला बळाचा वापर करण्याचा प्रसंग आलेला नाही यावरुन कोविडच्या दुसर्या संक्रमणाने नागरिकही भयभीत झाल्याचे दिसू येत आहे.

मागील दीड महिन्यांपासून राज्यातील काही जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. दररोज एकमेकांशी स्पर्धा करणार्या रुग्णसंख्येने मागील संपूर्ण वर्षातील सरासरीचे आकडे मोडीत काढण्यासोबतच कोविडच्या जिल्ह्यातील इतिहासात नवनवीन विक्रमही नोंदविले आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सक्रीय रुग्णांचा आकडाही आता 6 हजार 385 वर जावून पोहोचल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 242 रुग्ण समोर आले असून त्यातील 85 हजार 652 रुग्णांनी यापूर्वीच उपचार घेवून घर गाठले आहे. तर दुर्दैवाने जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 205 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी (28 फेब्रुवारी) जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 75 हजार 881 होती, तर सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 151 आणि मृतांची संख्या 1 हजार 143 इतकी होती. गेल्या 30 दिवसांत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत 579 रुग्ण दररोज या वेगाने 17 हजार 361 रुग्णांची भर पडली आहे. चालू महिन्यात कोविड मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली असून गेल्या 30 दिवसांत जिल्ह्यातील 54 नागरिकांचा कोविडने बळी घेतला आहे. फेब्रुवारीत मृतांची संख्या 44 होती तर महिन्यातील 28 दिवसांत एकूण रुग्णसंख्येत अवघी 130 रुग्ण दररोज या सरासरीने 3 हजार 645 जणांची भर पडली होती तर 31 जानेवारी रोजी सक्रीय रुग्णांची संख्याही अवघी 994 होती.

मार्चमध्ये जिल्ह्यात कोविड परतल्याने आणि त्याच्या प्रादुर्भावाची गती आत्तापर्यंतची सर्वाधिक असल्याने या महिन्याने जिल्ह्याची सावरलेली कोविड स्थिती पुन्हा बिघडवली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाली असून ठिकठिकाणचे कोविड केअर सेंटर्स आणि कोविड रुग्णालय पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने गजबजून गेल्याचे दृष्य जिल्ह्यात दिसू लागले आहे. कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा भरीस लागूनही शासनाकडून ‘लॉकडाऊन’ टाळून अन्य कठोर निर्बंधाचा आधार घेतला जात असून त्याद्वारे कोविडची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

त्याचाच भाग म्हणून गेल्या 28 मार्चपासून जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत सुरुवातीला जमावबंदी आणि त्यानंतर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. निर्बंधांच्या कालावधीत केवळ औषधांची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असून कामाशिवाय बाहेर आढळणार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा स्थानिक यंत्रणांनी दिला आहे. मात्र त्याचा वापर करण्याची वेळ अजूनपर्यंत तरी पोलिसांवर आली नसल्याचे दिसत आहे. अहमदनगरसह राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांच्या रुग्णसंख्येने यापूर्वीच चार आकडी रुग्णसंख्या ओलांडली असून या तालुक्यांच्या कोविड इतिहासात एकाच महिन्यात आढळलेली आत्तापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम सामान्य नागरिकांवरही झाला असून जिल्हाधिकार्यांनी लागू केलेल्या नियमांचे स्वयंस्फूतीने होत असलेले पालन हेच सांगत आहे. संगमनेरातील बसस्थानक परिसरासह मेनरोड, बाजारपेठ व तीनबत्ती चौक म्हणजे नेहमी गर्दीने ओसंडलेला परिसर समजला जातो. या भागातील असंख्य दुकानांमध्ये दिवसभर नागरिकांची मोठी रेलचेल बघायला मिळते. मात्र संचारबंदी आदेश लागू झाल्यापासून खुद्द व्यापारीच कोणी सांगायला येईल याची वाट न पाहता आपापली दुकाने आठच्या आंतच बंद करीत आहेत, नागरिकही आपली कामे आटोपून निर्बंधाच्या आधीच घराकडे निघत असल्याने रात्री आठ वाजताच शहराचा बहुतांशी भाग निर्मनुष्य भासत आहे. उर्वरीत तालुक्यांमध्येही असेच चित्र असून गेल्या तीन दिवसांत पोलिसांना कोठेही सक्तीने दुकाने अथवा बाजारपेठा बंद करण्याची वेळ आल्याचे वृत्त नाही.

जिल्हाधिकार्यांनी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाला मिळत असलेला स्वयंस्फूर्तीचा प्रतिसाद निश्चितच समाधानकारक आहे. असाच प्रतिसाद प्रत्येक नागरिकाने मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करण्यासही दिला तर जिल्ह्यात वाढलेला कोविडचा टक्का आटोक्यात आणण्यास मोठी मदत होईल. जोपर्यंत कोविड आहे तोपर्यंत नागरिकांनी सार्वजनिक, धार्मिक अथवा कौटुंबिक कार्यक्रमांना जाण्याचे अथवा असे कार्यक्रम आयोजित करण्याचे टाळल्यास जिल्ह्याची बिघडलेली घडी पुन्हा पूर्वपदावर येईल हे मात्र निश्चित.

