हजारो भाविक घेणार आज बिरोबाचे दर्शन विविध जिल्ह्यातील भाविक लावणार हजेरी

नायक वृत्तसेवा, साकुर
राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संगमनेर तालुक्यातील साकुर येथील बिरोबा देवाचे आज नागपंचमीच्या दिवशी हजारो भाविक दर्शन घेणार असून यावेळी विविध जिल्ह्यातील भाविक हजेरी लावणार आहेत. नागपंचमीच्या दिवशी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात भरणाऱ्या यात्रोत्सवाची यात्रा कमिटीने जय्यत तयारी केली आहे.

साकुर येथील जागृत देवस्थान असलेल्या बिरोबा देवाचा दरवर्षी श्रावण महिन्यात यात्रा उत्सव होत असतो. नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. या यात्रेसाठी परराज्यासह राज्यभरातून तसेच अहिल्यानगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबईसह विविध ठिकाणांहून लाखो भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यासाठी यात्रेची जय्यत तयारी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी आज मंगळवार दि. २९ जुलै रोजी नागपंचमी व ९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन आहे. या दोन्ही दिवशी लाखो भाविक बिरोबारायाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विरभद्र देवस्थानच्या वतीने सुसज्ज नियोजन करत यात्रेची जय्यत तयारी केली आहे. भाविकांना बिरोबारायाचे दर्शन सुलभ होण्यासाठी सुसज्ज अशी दर्शनबारी तयार करण्यात आली आहे.

Visits: 123 Today: 2 Total: 1109626
