पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कारांची घोषणा! डॉ.लवटे यांच्यासह दहा जणांचा पुरस्काराने होणार गौरव

नायक वृत्तसेवा, लोणी
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली असून, यावर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार कोल्हापुर येथील डॉ.सुनिलकुमार लवटे यांना जाहीर झाला असून, राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार मुंबई येथील डॉ.मिनाक्षी पाटील तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार डॉ.एच. व्ही. देशपांडे यांना तर राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार अतांबर शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना देण्यात येणार असल्याची माहीती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिली.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त सलग ३५ व्या वर्षी अखंडीतपणे साहित्य, नाट्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तिंना पुरस्कार देवून गौरविण्यात येत आहे. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे हे वर्ष शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष असून, दि. ८ ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथे या साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलींद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहीती पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी दिली.

डॉ.सुनिलकुमार लवटे यांना विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, १ लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ.मिनाक्षी पाटील यांच्या उत्तर, आधुनिकता आणि मराठी कविता या संशोधन ग्रंथास ५१ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

डॉ.विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार एच.व्ही देशपांडे यांच्या मराठी नवसमिक्षा उग्दम आणि विकास या संशोधन ग्रंथास देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने केला असून, २५ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अहिल्यनगर जिल्हा साहित्य पुरस्कार संगमनेर येथील संतोष भालेराव यांच्या लालाय्लू या कांदबरीस आणि अहिल्यानगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार संगमनेर येथील श्रीकांत कासट यांच्या दुर्ग वैभव या पुस्तकास देण्यात येणार आहे. प्रत्येकी १० हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार सातारा येथील दिलीप जगताप यांना देण्यात येणार असून, २५ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे. तमाशा कलावंत अतांबर शिरढोणकर (सांगली) व प्रसाद अंतरवेलीकर (निफाड) यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, प्रत्येकी २५ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कार निवड समितीमध्ये डॉ.एकनाथ पगार, डॉ.दिलीप धोंडगे आणि निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी काम पाहीले.

पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व जेष्ठ साहित्यीक तसेच नाट्य आणि कलाक्षेत्रातील व्यक्तींचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह प्रवरा परिवारातील सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

पुरस्कार निवड समितीने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा परिसर पुरस्कार संदिप तपासे यांच्या काठावरची माणसं या कथा संग्रहाला रुपये ७ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह, वयाच्या ८० वर्षांनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर शोधनिबंध सादर करणारे आणि त्यांचे सहकाराचा कल्पवृक्ष विठ्ठलराव विखे पाटील हे पुस्तक प्रकाशित करणारे डॉ.वसंतराव ठोंबरे यांनाही प्रत्येकी ११ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.

Visits: 109 Today: 2 Total: 1110176
