राम मंदिरासाठी उद्योजक प्रभाकर शिंदेंकडून अकरा लाखांची देणगी! भास्करगिरी महाराजांच्या हस्ते धनादेश संकलन समिती सदस्यांकडे सुपूर्द
नायक वृत्तसेवा, नेवासा
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी नेवासा तालुक्यातील खुपटी येथील पंचगंगा सीड्सचे मुख्य उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी अकरा लाखांची देणगी दिली आहे. सदर देणगीचा धनादेश श्री क्षेत्र देवगड येथे जाऊन त्यांनी भास्करगिरी महाराजांच्या हस्ते निधी संकलन समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द केला.
रामजन्मभूमीवर उभारल्या जाणार्या भव्य श्री राम मंदिरासाठी संपूर्ण भारत देशात निधी संकलन अभियान चालू आहे. रामसेवक घरोघरी जाऊन निधी जमा करीत आहेत. ज्येष्ठ साधूसंतांनी व विश्वस्त मंडळाने सूचविल्याप्रमाणे प्रत्येक रामभक्ताने या भव्य मंदिरासाठी किमान दहा रुपये द्यावेत अशी विनंती ते करतात. अशीच विनंती करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे निधी प्रमुख माजी आमदार चंद्रशेखर कदम, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक भरत निमसे आणि नेवासा तालुका निधी संकलन प्रमुख शंकर नळकांडे हे खुपटी येथील कृषीतज्ज्ञ व उद्योजक पंचगंगा सीड्सचे मालक प्रभाकर शिंदे यांच्याकडे गेले होते.
उद्योजक शिंदे यांनी सर्व माहिती, भूमिका समजावून घेतली. संध्याकाळी पाच वाजता श्रीक्षेत्र देवगड येथे येण्यास सूचवले. त्याप्रमाणे राम मंदिराचे सल्लागार व पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे निधी संकलन समितीचे संयोजक भास्करगिरी महाराजांकडे शिंदे त्यांचे पिताश्री व कुटुंबियांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून अकरा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. याबरोबरच वीट उत्पादक रामभाऊ खंडाळे व न्यूझीलंडस्थित गिरीजा लखन देशपांडे हिच्यावतीने सतीश मुळे यांनीही महाराजांकडे राम मंदिरासाठी धनादेश दिले.
निधी समर्पणानंतर भास्करगिरी महाराजांनी शिंदे परिवाराचा यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, समाजात धनवान खूप आहेत. पण त्यांच्यात दातृत्वाची भावना अभावानेच असते. देश, धर्म आणि समाजाची चिंता करणार्या आणि त्यासाठी झीज सोसणार्या शिंदे परिवाराचा आम्हांला अभिमान वाटतो. खुपटीसारख्या छोट्या खेड्यात वाढलेल्या प्रभाकररावांनी पंचगंगाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारतात कीर्ती संपादन केली आहे. प्रभू श्रीराम त्यांना उदंड यश देईल असा शुभाशीर्वाद त्यांनी शेवटी दिला.