सासू-सासर्‍यांचे पाठबळ, सुनेचे स्वप्न साकार! चांडक परिवाराचा आदर्श, सासरच्या मायेचे सर्वोत्तम उदाहरण

नायक वृत्तसेवा, अकोले 
रचना चे एलएल.बी.पर्यंत शिक्षण झाले होते. तिला पुढे एल.एल.एम. करण्याची प्रखर इच्छा होती. परंतु वैवाहिक जीवन हे प्रत्येकाच्या जीवनातले महत्वाचे पाऊल असते. म्हणून तिला एल.एल.एम. च्या शिक्षणाला काहीशी मुरड घालावी लागली. विवाहानंतर सासरच्या चांडक परिवारापुढे तिने तिची इच्छा प्रकट केली. आणि त्यांनी देखील लगेचच पुढील शिक्षणासाठी संमती दिल्याने रचनाला शिक्षणाची दारे पुन्हा खुली झाली. आणि  रचना ने देखील तिचे स्वप्न लग्नानंतर देखील पूर्ण केले. सून आणि सासर्‍यातील नात्याचा नवा मापदंड निश्‍चित करणार्‍या या घटनेने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला असल्याने चांडक परिवाराचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
 
महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेचे जनसंपर्क मंत्री, अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार अजय जाजू व मेघा जाजू यांची कन्या तर नितीन चांडक व पंकजा चांडक (नांदगांव) यांची स्नुषा व इंजिनीयर वैष्णव यांची अर्धांगिणी अ‍ॅड. रचना, लग्नानंतर चांडक परिवारात सामिल झाली. तिने मनमिळावु स्वभावाने चांडक परिवारातील सदस्यांची मने तर जिंकलीच, याशिवाय ‘बेस्ट इन वेस्ट’ मधुन विविध वस्तु करून नांदगांवकरासह, सासर मध्ये नावलौकीक मिळविला.
आज देशाच्या अनेक भागातून हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार अशा दुदैवी घटनांचे मथळे रोजच वृत्तपत्रात असतात. अशा स्थितीत  ही घटना  खर्‍या अर्थाने आदर्शव्रत ठरणारी आहे. जेथे सासरच्या परिवाराकडून सुनेच्या स्वप्नांना बळ देणं सोडाच, तर तिला समजूनही घेतलं जात नाही. तेथे  नितीन चांडक आणि परिवाराने  नवा आदर्श घालून दिला आहे. विवाहानंतर जबाबदार्‍या वाढलेल्या असतांनाही रचना हिने चांडक परिवारात आपली वेगळी ओळख तर निर्माण केलीच, त्याचबरोबर  आपले पुढील शिक्षण सुरूच ठेवले आणि ते यशस्वीपणे पूर्ण देखील केले. हा तिचा संघर्ष तर आहेच, पण त्याला  चांडक परिवाराची प्रोत्साहनाची आणि विश्‍वासाची प्रचंड ताकद मिळाली, त्यांनी तिला मार्गदर्शन केले, भक्कमपणे पाठीशी उभे राहून तिचा आत्मविश्‍वास वाढवतांनाच यशाच्या या प्रवासात प्रत्येक पावलावर भक्कम साथ देखील दिली.
आज जेव्हा रचना वैष्णव चांडक यांच्या यशाचा जल्लोष होत आहे. तेव्हा हे केवळ एका तरूणीच्या अविश्रांत परिश्रमाचंच फलित नाही, तर नात्यांच्या पवित्र बंधाचं आणि एक सुसंस्कृत कुटुंबाच्या प्रतिमेचे आदर्श उदाहरण ठरत आहे. एल.एल.एम.सारखी अत्यंत कठीण व प्रतिष्ठेची परीक्षा सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या स्विकारून ‘ए ग्रेड’ मध्ये उत्तीर्ण होऊन रचना हिने केवळ स्वतःचेच नाही, तर संपूर्ण चांडक परिवाराचे नाव उज्वल केले आहे. नांदगांव शहरातील प्रथितयश व्यापारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेल्या  रमेशचंद्र चांडक यांनी आपल्या नातसुनेला तर नितीन चांडक यांनी आपल्या सुनेला केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर मुलीप्रमाणे साथ दिली.
तसंही अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी सभा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या मार्गदर्शनानुसार ‘बेटी को ब्यावो, बहू को पढाओ’ या मापदंडाचा चांडक परिवाराने पूर्णतः स्विकार केल्याने चांडक परिवारातील प्रत्येक सदस्य हा कौतुकास पात्र आहे. 
Visits: 135 Today: 2 Total: 1103286

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *