संगमनेर तालुक्याच्या कृषी विभागाची लक्तरं वेशीवर! पर्यवेक्षकाकडून वारंवार अश्लील कृत्य; कारवाईसाठी वरीष्ठही धजावेना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षात संगमनेरातील अनेक शासकीय कार्यालयांमधील अनागोंदी आणि मनमानी कारभार वाढीस लागल्याचे विविध प्रकार समोर येत असतानाच आता तालुक्याच्या कृषी विभागातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत कृषी विभागात गेल्या सतरा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या सुरेश घोलप या पर्यवेक्षकाने आपल्याच विभागातील एका महिलेसोबतच्या प्रणयक्रीडेची छायाचित्रे सोशल माध्यमातील विभागाच्या समूहात टाकली. या समूहात संगमनेरसह अकोले, राहाता व कोपरगाव येथील वरीष्ठ कृषी अधिकार्यांसह 50 ते 60 जणांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक महिला आहेत. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने ‘ती’ छायाचित्रे डिलिटही केली आणि त्या समूहातील सर्वांना ‘रिमूव्ह’ही केलं, मात्र त्याच्या असल्याप्रकारांची पूर्वकल्पना असल्याने समूहात छायाचित्रे पडताच काहींनी त्याचे ‘स्क्रिन शॉट’ काढून ठेवले, तर व्हायरल विषय त्याच्या पत्नीच्या कानापर्यंत पोहोचल्याने सदरचा प्रकार चव्हाट्यावर येवून तालुका कृषी विभागाची लक्तरंही वेशीवर टांगली गेली.
एरव्ही प्रसिद्धी माध्यमांपासून दूर असलेल्या कृषी विभागाच्या संगमनेर, अकोले, राहाता व कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश असलेला ‘एस.बी.ओ.ए. स्पोर्ट्स’या नावाचा सोशल माध्यमात व्हाट्सअॅप समूह आहे. या समूहात तालुका कृषी अधीक्षकांसह, चारही ठिकाणचे तालुका कृषी अधिकारी, गट अधिकारी व अन्य कर्मचारी मिळून 50 ते 60 जण आहेत. विशेष म्हणजे याच समुहात कृषी विभागात कार्यरत असलेल्या जवळपास 25 ते 30 महिला कर्मचार्यांचाही समावेश आहे. या समूहाचा ‘ग्रुप अॅडमिन’ म्हणून तालुक्याचा कृषी पर्यवेक्षक सुरेश घोलप त्याच्या संचालनाचे कामकाज बघत असतो. विशेष म्हणजे अन्य शासकीय अधिकारी व कर्मचार्यांचा प्रत्येक तालुक्यातील कार्यकाळ ठरलेला असताना आणि त्यानुसार त्यांच्या नियमितपणे बदल्याही होत असताना सदरचा पर्यवेक्षक मात्र या नियमालाच अपवाद ठरला असून तो गेल्या सतरा वर्षांपासून संगमनेरातच कार्यरत आहे.
जवळपास 45 वर्षांहून अधिक प्रौढ असलेल्या या महाशयांचे कृषी विभागातच कार्यरत असलेल्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्यातून त्यांच्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच प्रणयक्रीडा रंगत असल्याच्या चर्चाही यापूर्वी कानावर आल्या आहेत. मंगळवारी (ता.16) मात्र या चर्चेचे रुपांतर वास्तव दर्शनात झाले आणि काही क्षणातच कृषी विभागाची लक्तरं वेशीवर टांगली गेली. सदरच्या पर्यवेक्षकाने ‘त्या’ महिलेसोबतच्या खासगी प्रसंगाची छायाचित्रे काढून ठेवली आहेत. मंगळवारी नजरचुकीने म्हणा किंवा जाणीवपूर्वक त्याने सकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी त्या महिलेसोबतच नग्नावस्थेत केलेल्या कृत्यांची ठळक छायाचित्रे सोशल माध्यमातील ‘एस.बी.ओ.ए. स्पोर्ट्स’ या समूहात शेअर केली.
सकाळी सकाळी विभागाच्या अधिकृत सोशल समूहात काहीतरी संदेश धडाधड पडल्याने अनेकांना अधिकार्यांच्या काही सूचना असाव्यात असे वाटले व त्यांनी तत्काळ ‘त्या’ समूहात जावून संदेश शोधण्याचा प्रयत्न केला असता सदरचा अतिशय घाणेरडा प्रकार नऊ छायाचित्रांमधून उघड झाला. त्यानंतर जवळपास दीड तासाने सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याच समूहातील एका अन्य महिला कर्मचार्याला हा सगळा प्रकार असह्य झाल्याने त्यांनी संबंधित पर्यवेक्षकाला त्याने केलेल्या चुकीची जाणीव करुन दिली. आपला प्रणय चक्क सार्वजनिक झाल्याचे ऐकून पायाखालची जमीन सरकलेल्या त्या पर्यवेक्षकाने लागलीच ती छायाचित्रे ‘डिलिट’ केली व सदरील समूहच बंद करण्याच्या हेतूने एक-एक करीत समूहातील सगळ्यांना ‘रिमूव्ह’ केले. मात्र सध्याचा जमाना विलक्षण असल्याचा त्याला विसर पडला. दीड तास समूहात असलेल्या ‘त्या’ नऊ छायाचित्रांचे अनेकांनी ‘स्क्रिन शॉट’ काढले आणि अन्य ठिकाणी ‘व्हायरल’ही केले.
सकाळी दहाच्या सुमारास सदरील छायाचित्रे आणि आपल्या रंगेल पतीचे वेगवेगळे किस्से त्याच्या धर्मपत्नीच्या कानापर्यंत पोहोचले आणि त्यांचा पारा चढला. रागाच्या भरात त्यांनी तडक शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या पतीचे सगळे रंगीत किस्से पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या कानावर घातले. त्यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल होवू शकते, तुम्ही तक्रार द्या; मी कारवाई करतो असे सांगत त्या पर्यवेक्षकाच्या पत्नीला फिर्याद देण्यास सांगितले. मात्र त्यांनी साप तर माराच, पण काठी माझी वापरु नका अशी भूमिका घेतल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. अखेर त्यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित महिलेने आपला पती ‘तू आता म्हातारी झाली आहेस, माझ्या घरातून निघून जा’ असे म्हणतं लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी सुरेश घोलप या रंगेल पर्यवेक्षकाविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 323, 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
संगमनेरच्या कृषी विभागात गेल्या सतरा वर्षांपासून ठाण मांडून बसलेला पर्यवेक्षक सुरेश घोलप हा अधिकारी अतिशय रंगेल आणि मनमौजी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वीही विभागाच्या सोशल समूहात अशाप्रकारचे पॉर्न व्हिडिओ व अश्लील छायाचित्रे टाकण्याचा प्रकार वारंवार केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने संगमनेर कृषी विभागाच्या समूहात पोर्नोग्राफीचे काही व्हिडिओ शेअर केले होते. त्यावरही कहर म्हणजे मध्यंतरीच्या काळात त्याने संगमनेर तालुका कृषी अधिकार्यांना त्यांच्या ई-मेलवर अशाच प्रकारच्या पोर्नोग्राफीसह अश्लिल छायाचित्रे पाठवली होती. त्याची वरीष्ठांनी दखल घेवून त्याच्या विरोधात चौकशीही सुरु केली. मात्र त्यालाही मोठा कालावधी उलटला असून अद्याप चौकशीचा कोणताही अहवाल समोर आलेला नाही. त्यावरुन वारंवार या रंगेल अधिकार्याकडून शिस्तभंग, विभागातील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे प्रकार घडूनही त्याच्या विरोधात आजवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा सध्या तालुका कृषी विभागात रंगली आहे. मंगळवारी सकाळी कृषी विभागातील दोन महिला कर्मचारी कार्यालयीन कामासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या, तेथून बाहेर पडत असतांना त्यांनीही समूहात आलेली ‘ती’ घाणेरडी छायाचित्रे पाहिल्याने त्यातील एकीला वांती तर दुसरीला चक्कर येवून ती महिला खाली कोसळल्याचेही समजते.
गेल्या सतरा वर्षांपासून संगमनेर तालुका कृषी विभागात बुडाला फेव्हिकॉल लावून चिकटून बसलेला हा पर्यवेक्षक अतिशय रंगेल प्रवृत्तीचा असल्याचे समजते. कृषी विभागात अनेक महिला कर्मचारीही कार्यरत असल्याने या प्रवृत्तीचा त्यांनाही पदोपदी त्रास सहन करावा लागतो. मात्र त्याच्याकडून वरीष्ठ अधिकारी असलेल्या सोशल समूहात अशाप्रकारची छायाचित्रे आणि व्हिडिओ चार-चारवेळा शेअर होवूनही त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्याच्याविषयी बोलण्यास कोणीही धजावत नसल्याचेही या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे. सदरची व्यक्ती आपल्या विभागातील कर्मचार्यांना वारंवार ‘अॅट्रोसिटी’ची धमकी देत असल्याची चर्चाही सध्या तालुका कृषी विभागात सुरु आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष्य देवून अशा रंगेल अधिकार्याला धडा शिकवण्याची गरज आहे.