जलजीवन योजनेला खोडा घालणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करा : खा. वाकचौरे

नायक वृत्तसेवा, राजूर
केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जलजीवन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊनही ठेकेदार आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अकोले तालुक्यातील एकही योजना पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे यास जबाबदार आसणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.

आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अकोले तालुक्यातील राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील विविध भागातील नागरिकांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या तक्रारींचा पाढा खासदार वाकचौरे यांच्या पुढे वाचला. त्यावर खासदार वाकचौरे यांनी या महत्त्वाकांक्षी योजनांना खोडा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश दिले. आढावा बैठकीत उपस्थित असणाऱ्यांचे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी स्वागत केले.गटविकास अधिकारी अमर माने, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळे,रुपेश गावित, अशोक धिंदळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता टी. डी. दहिफळे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एस.घुगे, महावितरणचे उपअभियंता व्ही. बी. सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी श्याम शेटे,स.पो.नी. दिपक सरोदे, विविध विभागांचे पदाधिकारी,मच्छिंद धुमाळ, संतोष मुर्तडक, महेश नवले, सुरेश गडाख, विविध गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत सरपंच आणि नागरिकांनी आपल्या भागातील रस्ते,वीज,पाणी, आरोग्य आणि शिक्षण आदी बाबतच्या समस्या खासदार वाकचौरे यांच्या पुढे मांडल्या. या बाबत उपस्थित कामचुकार अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.यावेळी खासदार वाकचौरे यांनी गाव तेथे रस्ता,स्मशानभूमी, पाणंद शिवार, नकाशातील तसेच नकाशा बाहेरील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.केंद्र सरकारच्या विविध योजनांचा महिला आणि तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Visits: 124 Today: 4 Total: 1106950
