मंगळवार पासून निळवंडे ओव्हरफ्लोचे कालव्यांना पाणी! जलसंपदा मंत्र्यांचे आदेश; आ.खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या समाधान कारक पावसामुळे भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे निळवंडे धरणात चांगल्या प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी निळवंडेच्या डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्यांतून सोडण्यात यावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाणी मंगळवार दि. १५ जुलै पासून दोन्ही कालव्यांना सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागास दिले आहेत.

संगमनेर तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे, ही गंभीर बाब लक्षात घेऊन आ.अमोल खताळ यांनी ७ जुलै रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे लेखी मागणी करून निळवंडे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी निळवंडे डाव्या आणि उजव्या कालव्यातून सोडण्यात यावे अशी मागणी केली होती.

या मागणीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने दखल घेत दोन्ही कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी मंगळवार दि.१५ जुलै पासून सोडण्यात येणार असल्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे निळवंडे डाव्या आणि उजव्या कालव्यांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच नदी काठच्या गावातील पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यास मदत होणार होईल तसेच या दोन्ही कालव्यांवर अवलंबून असणाऱ्या गावातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

Visits: 119 Today: 3 Total: 1109063
