शेवगाव डेपोमध्ये चालकाची बसला गळफास लावून आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; आर्थिक विवंचना असण्याचा अंदाज
नायक वृत्तसेवा, शेवगाव
शेवगाव येथील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय 56, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसच्या शिडीला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.29) भल्या सकाळी ही घटना उघडकीस आली. रात्री काकडे शेवटची बस घेऊन डेपोत आले आणि एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झाले. मध्यरात्री संप मिटल्याची घोषणाही झाली. मात्र, सकाळी काकडे यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एसटी कर्मचार्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या आत्महत्यांमागे आर्थिक विवंचनेचे कारण असल्याचे पुढे आले आहे, तेच यामागेही असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
एसटी कर्मचर्यांनी संप पुकरलेला असल्याने सर्व गाड्या डेपोत आणून उभ्या करण्यात आल्या होत्या. काकडे हेही शेवटची मुक्कामी बस घेऊन आले आणि संपात सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी डेपोत उभ्या असलेल्या बसला (क्र. एम. एच. 40, एन 8849) मागील बाजूला दोरीच्या सहाय्याने काकडे गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शुक्रवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास इतर कर्मचार्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यानंतर पोलिसांनी कळविण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.
काकडे यांच्या सेवानिवृत्तीला चारच वर्षे राहिली होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तालुक्यातील आव्हाने या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. त्या आधी ते सर्वांचे नेहमीप्रमाणे वागताना दिसत होते. कोणताही तणाव वगैरे दिसून आला नसल्याचे काही कर्मचार्यांनी सांगितले. पोलीस चौकशी सुरू आहे.
लॉकडाउननंतर एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. अहमदनगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचार्याची बहुधा ही तिसरी आत्महत्या आहे. तर राज्यात आत्तापर्यंत तीस कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक विंवचेतून या आत्महत्या होत आहेत. यातील बहुतांश घटना एसटी डेपोत किंवा स्थानकात एसटी बसलाच गळफास लावून झालेल्या आहेत. कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपात हाही एक मुद्दा होता. कर्मचार्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करीत असल्याचे सरकारने सांगितल्याने मध्यरात्रीच संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे, मात्र, शुक्रवारी सकाळी शेवगावमध्ये एसटी कर्मचार्याच्या आत्महत्येचीही बातमी घेऊन आली. दरम्यान, दिलीप काकडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.