इंदुरीकर महाराजांना 25 नोव्हेंबरपर्यंत दिलासा! व्यस्त असलेल्या जिल्हा न्यायालयाने दिली पुढची तारीख
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐच्छिक संतती प्राप्तीसाठी तीथीचे शास्त्र सांगून अडचणीत आलेल्या कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना आज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयात समक्ष हजर राहण्याबाबत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात इंदुरीकरांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सरकार पक्ष व बचाव पक्ष आपापला युक्तिवाद करणारे होते. मात्र ज्या न्यायाधिशांसमोर सुनावणी होणार होती त्यांच्याकडे अन्य प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरु असल्याने इंदुरीकर प्रकरणाला आता 25 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे.
आपल्या कीर्तनातून समाजातील अनिष्ट रुढी व परंपरांवर आघात करीत समाज प्रबोधन करणार्या कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी एका कार्यक्रमात अपेक्षित असलेली संतती प्राप्त करण्यासाठी सम आणि विषम तीथीचे पुराणातील दाखले दिले होते. त्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केल्यानंतर गेल्या जूनमध्ये त्यांच्यावर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पुढील तारीख देत न्यायालयाने इंदुरीकरांना समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात त्यानी अॅड.के.डी.धुमाळ यांच्यामार्फत संगमनेरच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयातील सुनावणीवेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने अॅड.रंजना गवांदे-पगार यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्याने गेल्यावेळी त्यावर युक्तिवाद होवून अखेर न्यायालयाने अंनिसची हस्तक्षेप याचिका मंजूर करतांना त्यांना या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान लिखित म्हणणे मांडण्याची मुभा देत पुढील सुनावणीसाठी आजचा (ता.28) दिवस निश्चित केला होता.
त्यामुळे संगमनेर नगरपालिकेच्या आवारातील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आज सकाळपासूनच माध्यमांसह नागरिकांनीही गर्दी केली होती. मात्र ज्या न्यायाधिशांसमोर सदर प्रकरणाचा युक्तिवाद होणार होता त्यांच्या समोर अन्य प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरु असल्याने दुपारी 3 वाजता इंदुरीकरांच्या प्रकरणाला 25 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे.