‘हॅट्स ऑफ शरद पवार साहेब’! पंकजा ताईंच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चेला उधाण
‘हॅट्स ऑफ शरद पवार साहेब’! पंकजा ताईंच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चेला उधाण
आमदार रोहित पवार यांनी पंकजा मुंडेंचे कौतुक करत विरोधकांना हाणला टोला
मुंबई, वृत्तसंस्था
ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याच्या विषयावर मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. शरद पवार यांनी या बैठकीत सकारात्मक तोडगा काढला आहे. पवार यांच्या भूमिकेचं पंकजा मुंडे यांनी ट्विट करत कौतुक केलं आहे. यावर आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रमुख निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे ऊस तोडणी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतला गेला आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसं ट्विटही त्यांनी केलं आहे. ‘कोरोनाच्या परिस्थितीत इतके दौरे, आपली बैठक आणि आपला काम करण्याचा स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळं जरी असले तरी कष्ट करणार्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवलं आहे’ असं म्हणत शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडे यांच्या या ट्विटलाच उत्तर देताना रोहित पवारांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच, त्यांच्यातील या खिलाडूवृत्तीचं कौतुकही केलं आहे. ‘राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. शिवाय, अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अपमान करणार्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरुर शिकावा,’ असा टोलाही विरोधकांना हाणला आहे.

