सेवाभाव हरपला; रुग्णलुटीच्या टोळीत आता ‘रुग्णवाहिका’ही झाल्या सामील! पांढर्या वेशातील काहींच्या साखळीतून सामान्यांच्या कष्टाच्या कमाईवरच पडतोय दररोज ‘पांढरा दरोडा’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्यावर्षी देशात दाखल झालेल्या कोविडच्या पहिल्या संक्रमणाने मानवतेचे आणि मानवातच दडलेल्या ईश्वराचे दर्शन घडविले. या काळात कोणी भूकेल्यांच्या मुखी अन्नाचा घास भरवत होते, तर कोणी तान्ह्या बाळांच्या दुधाची व्यवस्था करीत होते, कोणी घराच्या ओढीने शेकडों मैलांची पायपीट करणार्या मजुरांना आधार देत होते, तर कोणी मुक्या जनावरांच्या चारापाण्याची सोय पहात होते. पांढर्या वेशातील देवदूतांच्या समर्पणाचे वर्णन करायला तर शब्दच नव्हते. या कालावधीत रुग्णांची वाहतुक करण्यासाठी ‘108’ रुग्णवाहिकांचा मोठा वापर व्हायचा, त्यांनी बजावलेले कर्तव्यही बे तोडच होते. मात्र दुसर्या संक्रमणात हे चित्र बदलले आहे. माणसातला ‘देव’ दूर जावून त्याच्याजागी आता ‘दानव’ प्रकटला आहे. समोर आलेला रुग्ण आपल्याला कसा आणि किती ओरबाडता येईल असेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसू लागल्याने कोविडने क्षतीग्रस्त झालेल्यांची साखळी पद्धतीने बेमालुम लुट सुरु आहे. हे कोणीतरी थांबवा हो, अशी आर्त हाकही ठिकठिकाणांहून उठतेे आहे. मात्र ती यंत्रणेच्या कानापर्यंत पोहोचतच नसल्याने रुग्णवाहिकेपासून स्मशानापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोविडने संक्रमित झालेल्यांचे आर्थिक लचके तोडले जात आहेत. रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळून सुरु असलेला संतापजनक लुटीचा प्रकार मानवी उद्रेकाचे कारण ठरण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही, इतकी परिस्थिती गंभीर आहे.
मागील वर्षी एप्रिलमध्ये संगमनेरात पहिल्यांदाच कोविड बाधित आढळले. कोविड संक्रमणाच्या या पहिल्या लाटेच्यावेळी कोविडबाबत सखोल माहिती नसल्याने शासकीय आरोग्य यंत्रणा आणि बोटावर मोजता येतील इतक्याच खासगी रुग्णालयांच्या जीवावर यंत्रणेने या अदृष्य विषाणूच्या विरोधात दंड थोपटले. त्यावेळी रुग्ण हा आपल्या देशाचा नागरिक आहे, तो एक माणूस आहे आणि त्याला सहिसलामत ठेवण्याची जबाबदारीच नव्हेतर ते आपले कर्तव्यच आहे असाच भाव या सगळ्या मंडळींमध्ये होता. रुग्णालयातून उपचार घेवून बाहेर पडणार्या रुग्णांंना पुष्प देवून शुभेच्छा दिल्या जात होत्या, आणि रुग्णही यंत्रणेतील देवदूतांच्या समर्पणाला भारावून ओल्या नेत्रांनीच त्याचा स्विकार करीत कृतज्ञतेचे भाव व्यक्त करीत असल्याचे शेकडों प्रसंग आपण सर्वांनीच पाहीले, अनुभवले. मात्र याच महामारीच्या दुसर्या संक्रमणाने यासर्व गोष्टी अगदी उलट केल्या. वर्षभरापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात अमुलाग्र बदल झाला आहे. गेल्यावर्षी कोविडला घाबरुन आपल्या रुग्णालयांना टाळे ठोकून ‘स्वीच ऑफ’ झालेले, आपल्या मालकीच्या रुग्णवाहिका झाकून लॉकडाऊन उपभोगणारे या संक्रमणात मात्र जागे झाले ते मनातील ‘दानव’ सोबत घेवूनच. अर्थात आजही या साखळीतील अनेकजण ‘रुग्णसेवा हिच मानवसेवा’ असं मानणारे आहेतच.
दुसर्या संक्रमणात वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने खासगी कोविड केअर सेंटर्स आणि कोविड हेल्थ सेंटर्ससाठी मागेल त्याला परवानगीचे सूत्र स्विकारले. आणि तालुक्यातील दोन-दोन, चार-चार डॉक्टरांनी एकत्रित होत वेगवेगळ्या इमारतींमध्ये कोविड उपचार केंद्र सुरु केले. यातील अनेक ठिकाणी आजही रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी शर्थ केली जाते, तर अनेक ठिकाणी हातात आलेला रुग्ण आपल्याला पैसा कमवून देणारे साधन समजले जाते. त्यानुसार रुग्णाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येत आहेत. यासाठी प्रशासनाने ‘भरारी पथक’ नावाची ‘ऑडिटर’ टीमही तयार केली आहे, त्यांना प्रत्येकी एका रुग्णालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षभरात किमान या टीमकडून अमानुष लुट सुरु असूनही एकही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही, यावरुन बर्याच गोष्टींचा उलगडाही सहजच होतो. आतातर अशा काही रुग्णालयांच्या दिमतीला कसायाप्रमाणे वाट पाहणार्या रुग्णवाहिकाही सामील झाल्या आहेत.
नगर रोडवरील एखाद्या रुग्णालयातून अन्य रुग्णालयात जाण्यासाठी, अथवा एखाद्या रुग्णालयात कोविडचा बळी ठरलेल्या आणि त्याला अवघ्या एक-दिड किलोमीटर अंतरावरील स्मशानात नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची साखळी पद्धतीने अडवणूक केली जात आहे. ज्या अंतरासाठी साधारण काळात पाचशे अथवा हजार रुपये आकारले जातात त्याच अंतरासाठीचे महामारीतील दर आता पाच हजारांपासून दहा हजारांपर्यंत उंचावले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडे पर्यायच नसल्याने त्यांचाही नाईलाज होऊन त्यांना अखेर तोच पर्याय निवडण्यासाठी एकप्रकारे मजबूर केले जात आहे. संगमनेरात सर्रास सुरु असलेल्या या प्रकाराने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत, पण त्यांचा टाहो अजूनतरी ना लोकप्रतिनिधींच्या कानापर्यंत पोहोचला, ना प्रशासनाच्या. त्यामुळे ‘काही’ रुग्णालयांसह आता ‘काही’ खासगी रुग्णवाहिका चालकांसाठी कोविड 19 म्हणजे सामान्य माणसांनी आयुष्यभर कवडीकवडी करुन जमा केलेल्या पूंजीवरचा ‘पांढरा दरोडा’ ठरत आहे.
एकीकडे रुग्णालयातून तर दुसरीकडे रुग्णवाहिकेकडूनही कोविड बाधितांना लुटल्याचा एकामागून एक वार्ता धडकत असतांनाच ‘अत्यावश्यक’ सेवेच्या नावाखाली अर्निबंध सायरन लावून फिरण्याची मुभा मिळालेल्या काही रुग्णवाहिकांमधून अवैंध व्यवसायही केले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी संगमनेर पोलिसांनी रुग्णवाहिकेतून होणारी देशदारुची वाहतुक उघड केली होती. विशेष म्हणजे सदरची दारु दारुबंदी विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याची असल्याची माहितीही दैनिक नायकच्या हाती आहे, त्या अनुषंगाने जय जवान चौकानजीकचा ‘तो’ देशी दारुचा अड्डा ‘सिल’ही करण्यात आला आहे. याचाच अर्थ महामारीच्या नावाने वाट्टेल त्या मार्गाने पैशा कमावण्यात काही रुग्णालये आणि रुग्णवाहिका आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर प्रशासकीय पातळीवर नियंत्रण येण्याची गरज आहे, अन्यथा सामान्य जनतेचा संयमाचा उद्रेक झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीही शक्यता आहे.