जिद्दीच्या बळावर हर्षला बनली सहायक सहकार अधिकारी! पिंपळगाव देपाच्या राऊत कुटुंबाचे नाव सूनेनं केलं उज्ज्वल
नायक वृत्तसेवा, घारगाव
गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे हर्षलाला लहानपणापासून अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. मूलभूत सेवा सुविधांसाठी झगडावे लागलं. मात्र जिद्द आणि कष्टातून हर्षला राऊत सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागात सहायक सहकार अधिकारी झाली आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हर्षलाचे वडील कंपनीत काम करून कुटुंब चालवत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत घर तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलत हर्षलाचे त्यांनी लग्न करून दिले आणि हर्षला संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील राऊत कुटुंबातील किरण यांच्याबरोबर विवाहबद्ध झाली. हर्षलाचे वडील आज तिचं हे यश पाहायला या जगात नाही. मात्र आपल्या मुलीने काहीतरी अधिकारी व्हावं ही वडिलांची लहानपणाची इच्छा हर्षलाने पूर्ण केली आहे.
प्रकाश राऊत यांच एकत्रित कुटुंब असून, कुटुंबातील सदस्य शेती आणि व्यापार त्याचबरोबर दूध व्यवसाय करतात. हर्षलाही घरच्यांना शेतीत आणि घर कामात नेहमीच मदत करते. राऊत परिवारात हर्षलाचं आगमन झाल्यावर सासू-सासर्यांनी हर्षलाला शिक्षणाला पाठबळ दिलं. अभ्यास करून काहीतरी हो, आम्ही तुझ्या पाठिशी आहोत आणि तुझं पडलेलं कामही करायला सक्षम आहोत ही बहिणीची माया जाऊबाई पल्लवी राऊत आणि प्रियंका राऊत यांनी हर्षलाला दिली.
वडिलांचं छत्र दोन वर्षांपूर्वी हरपलं, मात्र वडिलांची जागा सासरे प्रकाश राऊत आणि सासू आशाबाई राऊत यांनी घेतली. तिला मोठ्या धाडसानं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला लावला. छोटसं बाळ राजवीर १ वर्षाचा असताना हर्षलानं लोकसेवा आयोगाच्या दोनवेळा परीक्षा दिल्या. मात्र ऐन परीक्षाच्याच वेळी स्वतःचा मुलगा राजवीर आजारी पडल्याने यशाने हर्षलाला अनेकदा हुलकावणी दिली. मात्र हर्षलानं जिद्द सोडली नाही, तिच्या या जिद्दीचं आता तिच्या कुटुंबातून कौतुक होत आहे.
सध्या एकत्र कुटुंब पद्धती कालबाह्य होत आहे. मात्र राऊत कुटुंब हे त्याला अपवाद आहे. तिघेही बंधू शेती बरोबरच व्यापार करतात. मात्र पती किरण, दीर पंकज आणि प्रवीण यांनी तिला अभ्यासासाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून दिली. हर्षलानं राऊत परिवाराचं नाव उज्वल करत थेट सहायक सहकार अधिकारी झाली आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना हर्षलानं सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून हर्षलानं एम. एसस्सी. अॅग्री पदवी संपादन केली. या परीक्षेत हर्षलानं २०० पैकी १७० गुण मिळवून महाराष्ट्रामध्ये दहा मुलींमध्ये पाचवी येण्याचा मान पटकावला. आपण मिळवलेल्या यशामध्ये घरातील दोन्ही जावा, सासू-सासरे, दीर यांचा मोठा आधार सोबत राहिला, त्यामुळेच मी ही परीक्षा देऊ शकले अशी भावना हर्षलानं व्यक्त केली आहे.