समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते सायन्ना एनगंदुल यांचे निधन! संगमनेरातील एका चळवळीचा अस्त झाला : ना. थोरात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते साथी सायन्ना एनगंदुल यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले, मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते. गेली साडेसात दशके वंचित, दलित, शोषित, आदिवासी, कामगार व शेतकर्‍यांसाठी अविरत संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची जनमानसात ख्याती होती. सततच्या प्रकृती अस्वास्थामुळे मागील 66 दिवसांपासून त्यांनी स्वेच्छेने अन्नत्याग केला होता. त्यातच आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने एका चळवळीचा अस्त झाला आहे अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संपूर्ण जीवन संघर्ष करणारे साथी सायन्ना एनगंदुल विडी मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारांची बैठक असलेल्या साथी एनगंदुल यांनी जीवनातील सुमारे 75 वर्ष समाजातील वंचित, दलित, शोषित, आदिवासी, कामगार व शेतकर्‍यांसाठी अविरतपणे संघर्ष केला. नेहमी स्वदेशाचा वापर आणि स्वावलंबी जीवनाचा पुरस्कार करणार्‍या अण्णांवर दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या विचारांचा मोठा पगडा होता.

चंद्रशेखर यांनी काढलेल्या भारतयात्रेत सहभागी होवून साथी एनगंदुल यांनी संपूर्ण भारत पालथा घातला. या यात्रेच्या निमित्ताने चंद्रशेखर यांच्याशी त्यांचा थेट संबंध आल्याने त्यांच्या विचारांनी ते भारावले. त्यामुळे त्यांच्यासारखाच पेहराव करीत त्यांनी दाढी राखण्यासही सुरुवात केली. अतिशय प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन असलेले साथी एनगंदुल आपल्या संपूर्ण सामाजिक जीवनात कधीही कोणत्याही अमिषाला बळी पडले नाहीत. त्यांनी सतत कामगार व मजूरांच्या जीवनात आनंद भरण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाच्या निमित्ताने अण्णांच्या मुखातून निघालेल्या घोषणांनी कारखानदारांना दरारुन घाम फुटायचा आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लागायचे.

चळवळीतील नेते एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, बापू काळदाते, मृणाल गोरे, साथी भास्करराव दुर्वे नाना अशा अनेकांसोबत त्यांची वैचारिक बैठक होती. त्यांच्याच प्रेरणेतून शेतकरी-शेतमजूर पंचायत, विडी मजदूर सभा, हिंद मजदूर सभा अशा विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी देशपातळीवरील सभाही गाजवल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो अथवा मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण, गोवा मुक्ती असो अथवा मंडल आयोगाची चळवळ या सगळ्यांमध्ये त्यांचा मोलाच सहभाग होता. गोवा मुक्तीच्या आंदोलनानंतर मिळणारी स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शनही त्यांनी नाकारली होती. आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना मिसाबंदीच्या कायद्याखाली तब्बल 19 महिने कारागृहात काढावे लागले होते.

साथी सायन्ना एनगंदुल यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या विविध आंदोलनांचा परिपाक म्हणजे विडी कामगारांचे वेतन महागाई भत्त्यांच्या निर्देशांकाशी संलग्न करण्याचा निर्णयख विडी कामगारांना निवृत्ती वेतन, त्यांच्यासाठी आरोग्यविषयक सुविधांची उपलब्धता, कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती व विडी कामगारांच्या घरकुलांसाठी मदत मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 91 वर्षाच्या आपल्या आयुष्यातील सुमारे 75 वर्ष मोर्चे, धरणे, जेलभरो, उपोषणे व सत्याग्रहाच्या माध्यमातून सतत संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी त्यांची वेगळी ओळख होती. गेल्या काही कालावधीपासून प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने त्यांनी अन्नत्यागाचा अवलंब केला होता. त्यातच आज (ता.25) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा चंद्रकांत, सून, एक भाऊ व बहिण, नातू, नातसून, पतवंडे असा मोठा परिवार आहे. आज सायंकाळी 5 वाजता संगमनेरच्या अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


साथी सायन्ना एनगंदुल संपूर्ण आयुष्य साधेपणाने जगले. समाजातील शेवटचा घटक सुखी व समाधानी व्हावा यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. जवळपास सात दशकांहून अधिक काळ त्यांनी कामगार संघटनांचे नेतृत्त्व करतांना त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला. खादीच्या कपड्यांचा वापर आणि गळ्यात शबनम अशी अतिशय साधी राहणी असलेल्या अण्णांचे विचार मात्र अतिशय उच्च होते. देशातील समाजवादी चळवळीतील अनेक थोर व्यक्तींसोबत त्यांची वैचारिक बैठक होती. त्यांच्या निधनाने एका चळवळीचा अस्त झाला आहे. त्यांच्या संघर्षमय स्मृतीस विनम्र अभिवादन.
– बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य

Visits: 8 Today: 1 Total: 80298

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *