‘सेमी-हायस्पीड’साठी पुण्याच्या खासदारांचा आग्रह! खासदार वाकचौरेंचे सर्व थड्यांवर हात; रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाची बैठक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
खोडदच्या ‘जीएमआरटी’ प्रकल्पामुळे पुन्हा एकदा अडखळलेल्या ‘पुणे-नाशिक’ सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आमदारांपाठोपाठ आता खासदारही पुढे सरसावले आहेत. रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागातील सर्व खासदारांची पुण्यात सोमवारी बैठक झाली. यावेळी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी खासदारांच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या खासदार मेधा कुलकणी व डॉ.अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघातील रेल्वेच्या अन्य कामांसह प्रलंबित पुणे-नाशिक थेट रेल्वेमार्गाचे जोरदार समर्थन करताना ‘जीएमआरटी’ प्रकल्पापासून उंचीवर अथवा बोगद्यातून मार्ग नेण्याची मागणी केली. शिर्डीच्या खासदारांनी मात्र आपला पहिलीचाच पाढा वाचताना सगळ्या थड्यांवर हात ठेवत एकाचवेळी अनेक रेल्वेमार्गांची मागणी करीत ‘पुणे-नाशिक’ बाबत आपली अनास्था कायम ठेवली.


मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्या अध्यक्षतेखाली, रेल्वेचे प्रधान विभाग प्रमुख, पुणे व सोलापूर विभागाचे व्यवस्थापक यांच्यासह दोन्ही विभागातील सर्व खासदारांची पुण्यात बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, डॉ.अमोल कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, नीलेश लंके, श्रीरंग बारणे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहीते-पाटील, विशाल पाटील, रजनी पाटील, नितीन जाधव-पाटील, शिवाजी काळगे व माया नारोलिया आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सर्व खासदारांच्या रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा, प्रलंबित रेल्वेमार्गाबाबतचे विषय आणि मागण्या जाणून घेतल्या.


यावेळी ‘पुणे-नाशिक’ थेट रेल्वेमार्गाचे जोरदार समर्थन करताना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी जुन्नर जवळील ‘जीएमआरटी’च्या शास्त्रज्ञांचा या द्रुतगती रेल्वेमार्गाला विरोध नसल्याची बाब अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली. या प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा विचार करुन काम व्हावे इतकीच त्यांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाजवळून हा मार्ग उंचावरुन किंवा बोगद्यातून मार्गिका काढून पुढे नेता येईल अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच, या रेल्वेमार्गासाठी यापूर्वीच सिन्नर, संगमनेर व जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. औद्योगिक आणि भौगोलिकदृष्ट्या नोकदारांबरोबरच शेतकर्‍यांच्या शेतमालासाठी हा रेल्वेमार्ग खूप महत्वाचा असल्याचे सांगत त्यांनी पूर्वीच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसारच (डीपीआर) या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची जोरदार मागणी केली.


पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना पुणे स्थानकाचे सुशोभिकरण आणि स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी नाशिकमधील आगामी सिंहस्थाच्या विषयाला स्पर्श करीत पुणे-नाशिक या दोन महानगरांदरम्यान थेट रेल्वेमार्गाची गरज अधोरेखित केली. प्रयागराज येथील महाकुंभाला देशभरातील नागरीकांनी केलेल्या गर्दीचा उल्लेख करताना नाशिककडे होणार्‍या दळणवळणाच्या विषयाला हात घालताना सिंहस्थापूर्वीच पुणे-नाशिक प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.


संगमनेर व अकोले मतदारसंघाने दिलेल्या मताधिक्क्यामुळे विजयी झालेले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेही या बैठकीला आवर्जुन उपस्थित होते. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गाबाबत त्यांच्याकडून जोरदार मागणी होईल अशीच या दोन्ही तालुक्यातील नागरीकांना आशा होती, प्रत्यक्षात मात्र त्यांनी निराशाच केली. रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांसमोर महत्त्वाच्या मागण्यांवर बोलण्याची आणि ती मार्गी लावून घेण्याची संधी असतानाही शिर्डीच्या खासदार महोदयांनी बैठकीला राजकीय सभा समजून बेलापूर परिसरातील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणांपासून कोपरगावच्या आंचलगाव स्टेशनमधील सुविधांपर्यंत आणि शिर्डी अंमळनेरपासून शिर्डी-नगरसुलपर्यंतच्या अर्धाडझन नवीन रेल्वेमार्गाची मागणी करीत सध्या तापलेल्या ‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन पराभवाच्या छायेत असतानाही विजयाचा मार्ग दाखवणार्‍या संगमनेर व अकोले तालुक्यावरील त्यांचे प्रेम मात्र पुतणा मावशीचे असल्याचेही दिसून आले.


विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रश्‍नावर राजकारणविरहित भूमिका घेताना या प्रकल्पात येणार्‍या सर्व मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या बैठकीपासून लांब असलेल्या अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही त्यानंतर वारंवार या रेल्वेमार्गाचा विषय काढून या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दाखवली होती. खासदार डॉ.अमोल कोल्हे सुरुवातीपासूनच या प्रकल्पासाठी आग्रही आहेत, त्यात आता पुण्याच्या आणखी एका खासदारांचेही बळ समावीष्ट झाल्याने ‘जीएमआरटी’च्या कारणाने अडखळलेल्या या रेल्वेमार्गाचा प्रवास पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकल्पाबाबत शिर्डीच्या खासदारांची भूमिका संगमनेरकरांच्या नाराजीला कारणीभूत ठरणारी आहे.


रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागातील सर्व खासदारांकडून प्रलंबित प्रकल्प, सूचना, मागण्या या गोष्टी जाणून घेण्यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी पुण्यात बैठक बोलावली होती. या बैठकीला संगमनेर व अकोल्यातील मतदारांमुळे लोकसभेत पोहोचलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरेही उपस्थित होते. संगमनेरकरांनी त्यांना भरभरुन केलेल्या मतदानाच्या बदल्यात त्यांच्याकडून ‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गाबाबत जोरदार मागणी होण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांनी या प्रकल्पासोबतच अन्य अर्धाडझन नूतन प्रकल्पांचे सर्वेक्षण व्हावे अशी ढोबळ मागणी करीत चक्क ‘पुणे-नाशिक’चे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही भूमिका संगमनेरकरांच्या नाराजीचे कारण ठरली आहे.

Visits: 147 Today: 1 Total: 1103397

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *