शालेय साहित्याची मदत समाजासाठी दिशादर्शक : चौधरी

नायक वृत्तसेवा, अकोले
आपल्यामुळे कोणाचे तरी जीवन सुखी व आनंदी होत आहे, ही भावना अतिशय उत्कट व आध्यात्मिक समाधान देणारी आहे. स्व.शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत ही समाजासाठी अनुकरणीय आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन नगर विकास मंत्रालयाचे सहसचिव विजय चौधरी यांनी केले.

रविवारी, येथील अगस्ती मंदिर गुरुकुलच्या ५४ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांनासंगमनेर तालुक्यातील आश्वी येथील स्व.शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोडगे परिवाराकडुन शालेय साहित्याची मदत करण्यात आली. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात चौधरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अगस्ती देवस्थान ट्रस्ट समितीचे खजिनदार किसन लहामगे, विश्वस्त रामनाथ मुर्तडक, राधाकृष्ण आरोटे, वनवासी कल्याण आश्रमाचे रामदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेरच्या प्रा. मंगल गोडगे, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, मंदा सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या आराध्य भोर या विद्यार्थ्यास विजय चौधरी यांनी परदेशी बनावटीचे घड्याळ भेट दिले.यावेळी आदित्य गोडगे, रामदास सोनवणे यांची भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोकुळ आरोटे, अमित नाईकवाडी, आदित्य कडलग, धनश्री आरोटे, ऋतुजा आरोटे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन विश्वस्त रामनाथ मुर्तडक यांनी तर आभार गोकुळ आरोटे यांनी मानले.

वृषाली कडलग म्हणाल्या, गरजू विद्यार्थ्यांना योग्य वेळी झालेली मदत त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दिशादर्शक ठरेल असे सांगितले.

Visits: 90 Today: 2 Total: 1103276
