८४ शेतकरी कुटुंबांचा ‘आदर्श गोपालक’ पुरस्काराने गौरव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेती आणि दुग्धव्यवसायात यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या कष्टकरी गोपालक शेतकरी कुटुंबांचा गौरव करण्यासाठी सह्याद्री ॲग्रोव्हेट टीमतर्फे दरवर्षी ‘गोपालक सन्मान सोहळा’आयोजित केला जातो. या उपक्रमा अंतर्गत यंदा नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि धाराशिव अशा विविध जिल्ह्यातील ८४ आदर्श गोपालक कुटुंबांचा ‘आदर्श गोपालक’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सह्याद्री टीम मार्फत गेल्या ३ वर्षांपासून शेतकरी बांधवांच्या या कार्याची दाखल घेत आदर्श गोपालक पुरस्कार दिला जातो.या सन्मान सोहळ्यात प्रत्येक तालुक्यातून निवडलेले एक शेतकरी कुटुंब ‘आदर्श गोपालक’ म्हणून गौरवले जाते. शेतकऱ्याला सन्मानचिन्ह तर घरातील गृहिणीला खास पारंपरिक पैठणी देऊन सह्याद्री ॲग्रोव्हेट टीम तर्फे त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. हा पुरस्कार अहिल्यानगर ३०, नाशिक ६, पुणे १७, बुलढाणा ३, नांदेड ५, सातारा,सांगली ३, सोलापूर ११,बीड आणि धाराशिव ४ आणि मध्यप्रदेश राज्यातील ५ अशा एकूण ८४ शेतकरी बांधवांना गोपालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शेतकरी सुशिक्षित झाला की, गोठ्याचे यांत्रिकीकरण आपोआप होते. या तत्त्वावर विश्वास ठेवत सह्याद्री ॲग्रोव्हेट गेली अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. गोठा व्यवस्थापन, गायींचे आरोग्य, दुग्धोत्पादनात वाढ आणि स्वच्छता या सर्वच बाबींमध्ये या आदर्श गोपालकांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे.यंदाचा गोपालक सन्मान सोहळा सन्मानित झालेल्या ८४ गोपालक कुटुंबांमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही नवा आत्मविश्वास निर्माण करणारा झाला असून, हा उपक्रम ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

वर्षभर गोठ्यात मेहनत करणारा शेतकरी जेव्हा यांत्रिकीकरण, स्वच्छता, व वैद्यकीय व्यवस्थापन आदी उपक्रम राबवतो, तेव्हा त्याचे कार्य प्रेरणादायी ठरते. अशाच शेतकऱ्यांचा सन्मान करून इतरांनीही या कुटुंबाचा आदर्श घ्यावा, हा मुख्य उद्देश या उपक्रमामागे आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1415345
