संगमनेर शहर ठरतंय जिल्ह्यातील गांजा तस्करीचे वलयांकित केंद्र मालदाड रोडवरील छाप्यात सहा लाखांच्या गांजासह दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरालगतच्या कासारवाडी परिसरातून राज्यातील विविध ठिकाणी होणारी गांजा तस्करी सर्वश्रृत असतांना आता मालदाड रोडवर नवीन गांजा विक्री केंद्राचा खुलासा झाला आहे. रविवारी सायंकाळी शहर पोलिसांच्या पथकाने घातलेल्या छाप्यात सुमारे सहा लाखाच्या 77 किलो वजनाच्या गांजासह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्या सर्वांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने संगमनेरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून कासारवाडीसह शहरातील पूर्वेकडील गांजा तस्करीचे केंद्र तात्पूरते बंद ठेवण्यात आले आहेत.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.20) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा परदेशी यांना खबर्यामार्फत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर बातमीची खातरजमा करुन वरीष्ठ अधिकार्यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक रोशन पंडित यांनी कारवाईचे नेतृत्त्व स्विकारीत तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक परदेशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल आयुब शेख, पो.कॉ.सचिन उगले व महाले आदी फौजफाट्यासह सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास मिळाल्या माहितीच्या ठिकाणी छापा घातला.
पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार मालदाड रोडवरील शंकर टाऊनशीप, कटारियानगर येथील पहिल्या क्रमांकाच्या गल्लीतील एका घरात जययोगेश्वर दगु गायकवाड (वय 24, रा.रांजणगाव देशमुख, ता.कोपरगाव, हल्ली रा. शंकर टाऊनशीप), दीपक सुरेश तुपसुंदर (वय 34, रा.खांडेश्वर मंदिराजवळ, खांडगाव) व विशाल निवृत्ती आरणे (वय 26, रा.रांजणगाव देशमुख, ता.कोपरगाव, हल्ली रा. मालदाडरोड) हे तिघे आढळून आले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता चार वेगवेगळ्या पांढर्या रंगाच्या गोण्यांमध्ये काळपट हिरव्या रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेले वनस्पतीचे शेंडे भरुन ठेवल्याचे व त्या बाजूलाच विक्रीच्या हेतूने वजनकाटा व प्लॅस्टिकच्या पिशव्या इत्यादी साहित्यही दिसून आले.
सदरचा सगळा माल पोलिसांनी जप्त करुन त्याचे वजन केले असता दोन गोण्यांमध्ये प्रत्येकी 23 किलो 160 ग्रॅम वजनाचा आणि प्रत्येक गोणीचे मूल्य 1 लाख 84 हजार असलेला, तिसर्या गोणीत 24 किलो 110 ग्रॅम वजनाचा आणि 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा तर चौथ्या गोणीत 6 किलो 905 ग्रॅम वजनाचा आणि 56 हजार रुपये किंमतीचा एकुण 6 लाख 16 हजार रुपये किंमतीचा 77.335 किलो गांजा आठशे रुपयांचा वजनकाटा व 144 रुपयांच्या पॉलीथीन पिशव्या, तसेच 3 लाख 10 हजार रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार (क्र.एम.एच.14/बी.आर.9484), 60 हजार रुपये किंमतीचे तिघांचे तीन मोबाईल संच असा एकुण 9 लाख 86 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व सदर घराला सील ठोकले.
या प्रकरणी उपनिरीक्षक परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील तिनही आरोपींविरोधात अंमली औषधी द्रव्य, मनप्रभावी पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब) (2) (क), 29 प्रमाणे वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पुढील तपासासाठी पोलिसांकडून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संगमनेर आणि गांजा हे सूत्र आता अगदी घट्ट झाले आहे. कधीकाळी जिल्ह्यातील कोल्हार येथून राज्यभर आणि राज्याबाहेरही गांजा तस्करी चालत असत. मात्र तेथील गांजा केंद्र पोलिसांनी उध्वस्त केल्यानंतर संगमनेरातील कासारवाडीतून मोठ्या प्रमाणात गांजाविक्री होवू लागली. दोन वर्षापूर्वी दक्षिण भारतातून एक कोटी रुपयांचा गांजा घेवून संगमनेरकडे येत असतांना कासारवाडीतील गांजा तस्कर महिलेसह पाच जणांना अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडले होते. त्यावेळीही सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर झालेली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.
संगमनेर शहरालगतच्या कासारवाडीसह शहराच्या पूर्वेकडील काहीभागात गांजा विक्री मोठ्या प्रमाणात चालते. आता रविवारच्या कारवाईने मालदाड रोडवरही मोठ्या प्रमाणात गांजा विक्री व साठा होत असल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यात संगमनेर गांजाचे वलयांकित विक्री केंद्र ठरत असल्याचे दिसू लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास जिल्ह्यातील गांजा तस्करीची पाळेमूळे उध्वस्त होवू शकतात.