अबब! तब्बल तीन लाख अकरा हजार रुपयांचा बोकड

महेश पगारे, अकोले
तालुक्यातील तांभोळ येथील सतीष कराळे या शेळीपालकाने तब्बल 3 लाख 11 हजार रुपयांचा आफ्रिकन बोअर जातीचा देखणा बोकड खरेदी केला आहे. इतका महागडा बोकड सध्या भलताच भाव खात असून, अनेक पशुप्रेमी त्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहे.

तांभोळ येथील शेतकरी सतीष कराळे यांनी शेतीला पूरक व्यवसाय शेळीपालन सुरू केले आहे. यासाठी त्यांनी अगोदर परिपूर्ण अभ्यास व प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार त्यांनी शेळ्यांसाठी गोठा उभारला आहे. यामध्ये सध्या आफ्रिकन बोअर व बिटल (पंजाबी) जातीच्या एकूण 25 मादी शेळ्या तर एक आफ्रिकन बोअर जातीचा ‘मास्टर’ बोकड आहे. हा बोकड त्यांनी पाथर्डी येथून तब्बल 3 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केला आहे. अतिशय देखणा व रुबाबदार वर्णाचा हा आफ्रिकन बोअर जातीचा बोकड असून बाजारात त्याला प्रचंड मागणी असते. याशिवाय उत्तम संगोपन केल्यास इतर जातींच्या तुलनेत त्याचे 200 ते 250 ग्रॅमपर्यंत वजन वाढते. त्यामुळे शेतकर्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करावे, असा सल्ला सतीष कराळे यानिमित्ताने देत आहे.
